माणगाव : गायन, वादन कलेत पारंगत व्हायचे असेल तर मन लावून रियाज करावा लागतो. चार-दोन महिन्यांत किंवा वर्षभरात संगीत कला साध्य करता येत नाही. गुरुंनी दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण केला तर नक्कीच यश मिळते. कोणतीही कला असो ती आत्मसात करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे प्रतिपादन दत्तात्रय सावंत यांनी केले.
आमरोळी (ता. चंदगड) येथील तु. धा. कांबळे (गुरुजी) येथील प्रेरणा फौंडेशनतर्फे अडकूर येथे गणेश मंदिरात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल माटले होते.
विजयकुमार कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी अभिजित पाटणे, डॉ. कृष्णा होरंबळे, नीलेश अस्वले (झुलपेवाडी), तुषार हनुमंते (उत्तूर) यांनी मनोगत व्यक्त केले.
इंटरनॅशनल एकल (ऑनलाईन) तबला वादन स्पर्धा २०२१ मध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या हर्ष अमर जांभळे (उत्तूर), स्वप्निल विठ्ठल गडदे (कानडी), काजल लक्ष्मण पाटील (सावर्डे) यांच्यासह शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.
शशिकांत वाईंगडे, रमेश पाटील (बोंजुर्डी), बाबूराव पाटील, लक्ष्मण पाटील (सावर्डे), उत्तम मेंगाणे (आमरोळी), हृषिकेश माटले (अडकूर) या मान्यवरांसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. वनिता कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. तुषार हणुमंते यांनी आभार मानले..
फोटो ओळी : अडकूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा विजयकुमार कांबळे यांच्याहस्ते सत्कार झाला.
क्रमांक : १७०८२०२१-गड-०४