गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नियोजित नाट्यगृह तथा सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी वितरित करून काढून घेतलेला पाच कोटींचा निधी त्वरित परत द्यावा, अन्यथा तालुका बंद करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती व कारखान्याचे नूतन संचालक अमर चव्हाण यांनी सोमवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिला. सभापती मीनाताई पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. आठवड्यापूर्वीच राज्य शासनाने गडहिंग्लज पालिकेला पाच कोटींचा निधी दिला होता. मात्र, गडहिंंग्लज कारखान्याच्या राजकारणातून तो निधी तडकाफडकी परत घेण्यात आला. त्याबद्दल शहरासह तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचे पडसाद येथील पंचायत समितीच्या सभेतही उमटले. या प्रकाराबद्दल सभेत पालकमंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला. चव्हाण म्हणाले, गडहिंग्लज शहरात कारखान्याचे केवळ हजारभर सभासद आहेत. मात्र, निवडणुकीतील पराभवाच्या नैराश्येतून शासनाकडून ‘गडहिंंग्लज’ला मिळालेला निधी परत घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील ६० हजार नागरिकांवर अन्याय झाला आहे. पं. स. सदस्य व जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी उभारले जाणारे नाट्यगृह ही तालुक्याची शान ठरणार आहे. मात्र, त्यासाठी दिलेला निधी राजकीय आकसातूनच परत घेऊन पालकमंत्र्यांनी हीणकस प्रवृत्ती दाखविली आहे. त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. यावेळी उपसभापती तानाजी कांबळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
निधी परत न दिल्यास तालुका बंद करू
By admin | Updated: April 5, 2016 00:53 IST