कागल : राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या उभारणीबद्दल खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे कुभांड भाजपा नेत्यांनी रचले आहे. यासाठी किरीट सोमय्या यांना पुढे केले आहे. मुश्रीफांसारख्या नेत्याला त्रास देणे म्हणजे गोरगरिबांचा आधारवड उद्ध्वस्त करण्यासारखे आहे. वेळ पडली तर कागलची जनता मुंबईला जाऊन सोमय्या यांच्या घरावर निषेध मोर्चा काढेल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी दिला.
कागल येथे शाहू सभागृहात गुरुवारी आयोजित निषेध सभेत रमेश माळी बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नवल होते, ज्येष्ठ नागरिक संघाचे श्यामराव पाटील, प्रकाश नाळे, महिला आघाडीच्या पद्मजा भालबर, संजय चितारी, गंगाराम शेवडे, आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार संजय घाटगे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. स्वागत प्रवीण काळबर यांनी केले. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, अजित कांबळे, नितीन दिंडे आदींची भाषणे झाली. आभार संग्राम लाड यांनी मानले.
चौकट1)
● कागल शहरातून पंचवीस लाख देणार
सोमय्या याच्यावर शंभर कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे. यासाठी न्यायालयात ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही कागलकर पंचवीस लाख रुपये गोळा करून मंत्री मुश्रीफ यांना देणार आहोत, असे प्रकाश गाडेकर यांनी जाहीर केले.
रविवारी जल्लोषी स्वागत करणार
मंत्री मुश्रीफ यांच्यावरील आरोपाने कागलच्या बहुजन समाजात असंतोष पसरला आहे. कार्यकर्त्याच्या पायाला काटा लागला तरी काळजी करणारे हे नेतृत्व आहे. ते रविवारी कागलमध्ये येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सगळे कागल रस्त्यावर येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करूया, असे माजी नगराध्यक्ष अजित कांबळे यांनी सांगितले.