कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आंदोलन करणारच. आदोलन करतोय म्हणून मंत्रिपद देणार नसाल तर देऊ नका असे सांगतानाच आमच्या जिवावरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या आमची अडचण होत असेल तर भाजपने खुशाल आम्हाला बाजूला करावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.‘रासप’चे नेते महादेव जानकर यांनी मंत्रिपद न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहात? अशी विचारणा केली असता, आम्ही सरकारमधून का बाहेर पडावे? त्यांना अडचण वाटत असेल तर आम्हाला काढून टाकावे. मुळात आम्ही सत्तेसाठी सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकरीविरोधी धोरण घेतल्याने आम्ही महायुतीत सहभागी झालो. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शरद पवार यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल विचारले असता शेट्टी म्हणाले, पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटे करतात. सत्तेत असताना शेतकऱ्यांना कितीवेळा कर्जमाफी द्यायची, असा सवाल आम्हाला ते करत होते. आता विरोधात बसल्यानंतर कर्जमाफीची मागणी करत आहेत. त्यांच्या दुटप्पी भूमिकेची जनतेला सवय झाल्याचा टोलाही हाणला. चळवळीत काम करत असताना आपण मतदारसंघातील विकासकामेही केली आहेत. केवळ प्रसिद्धी न केल्याने मी काहीच करत नसल्याची टीका काही मंडळी करत आहेत. वर्षभरात तीन कोटी ८९ लाखांची विकासकामे केली असून, ७१ लाखांची कामे प्रस्तावित असल्याचेही शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)भाषणे करून ठिबक होणार का ?राज्यातील सर्व उसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्याशिवाय कारखान्यांना परवाना सरकार देणार नाही. सरकारचा प्रयत्न चांगला आहे; पण केवळ भाषणे करून चालणार नाही. पूर्वी केलेल्या ठिबकचे अजून अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मग पाणी कसे वाचणार ? असा टोला शेट्टी यांनी राज्य सरकारला हाणला. चौकशी थांबविण्यासाठीच पवारांची उठाठेव शरद पवार यांनी सरकारला अल्टीमेटम दिल्याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, सरकार स्थापन करताना त्यांनी न मागताच पाठिंबा दिला. केंद्र सरकारसोबत बसून त्यांनी साखर उद्योगाचा रोडमॅप केला. त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही, अशी खिल्ली उडवत त्यांच्या सरकारच्या काळातील चौकशी थांबविण्यासाठीच अशी उठाठेव ते करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
अडचण होत असेल तर खुशाल बाजूला करा
By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST