लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर - जय भारत शिक्षण संस्थेत शिक्षक व शिक्षिकांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. याची चौकशी सोमवारी (दि. ४) मुख्याध्यापक भवनात आयोजित केलेल्या बैठकीत केली जाईल. यातील दोषींची गय करणार नाही, असा इशारा आमदार जयंत आसगावकर यांनी शनिवारी दिला.
आमदार आसगवकर म्हणाले, जय भारत शिक्षण संस्थेचे संस्थाचालक जाधव हे शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अत्याचार करीत असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. सर्व शिक्षकांनी माझ्याकडे भूमिका मांडली आहे. त्यानुसार मी या ठिकाणी येऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने शिक्षण संस्थाचालकांची, कोअर कमिटीची बैठक येत्या सोमवारी मुख्याध्यापक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि शहर नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, खासगी शिक्षण मंडळ यांसह शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असतील, असे आमदार आसगावकर यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण प्रशासन अधिकारीही या बैठकीला उपस्थित असतील.
या बैठकीत जे काही आरोप शिक्षकांकडून संस्थाचालकांवर केले गेले, त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. असेदेखील आमदार जयंत आजगावकर यांनी सांगितले. यातून शैक्षणिक व्यासपीठ योग्य न्यायनिवाडा करील. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही आमदार आसगावकर यांनी दिला.
चौकट
शिक्षकांना आमदारांनी काढले बाहेर
दरम्यान, अत्याचार झालेल्या शिक्षकांनी या शाळेवर मोर्चा काढला होता; तर सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या शाळेमुळे शिक्षक शाळेत उपस्थित होते. मात्र उपस्थित शिक्षकांनी तोंड उघडू नये म्हणून संस्थाचालकांनी काही शिक्षकांना वर्गात कोंडून ठेवण्यात आले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी स्वतः वर्गात जाऊन या शिक्षकांना बाहेर काढले व संस्थाचालकांकडून तुमच्यावर अन्याय होतोय का, अशी विचारणा केली.