कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या जिल्ह्यातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव आहे. यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर दलित संघटनांकडून मंगळवारी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. नावात बदल न केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याचे संघटनांचे पदाधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही विद्यामंदिराला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली. शिक्षण प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण प्रशासनाविरोधात खेदजनक प्रतिक्रिया नोंदविली. नावात बदल न केल्यास शिक्षण प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधी मागासवर्गीय संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे म्हणाले, प्राथमिक शाळेला ‘हरिजनवाडा’ नाव असणे दुर्दैवी आहे. जातीचा शिक्का असलेले हे नाव बदलावे, असे एकाही शिक्षणाधिकाऱ्यांना वाटले नाही, हीच बाब संतापजनक आहे. प्रशासनाने नावात बदल न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार आहे. दलित सेनेचे सुनील शेळके म्हणाले, ‘लोकमत’मुळे शित्तूर वारुण येथील शाळेला ‘हरिजनवाडा’ नाव असल्याचे कळले आहे. प्रशासनाने नावात बदल करावा; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे शाळेचे असलेले नाव बदलावे, यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली आहे. चर्चेनुसार नावात बदल करण्यासंबंधी शिक्षण विभागास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. नावात बदल होईल. - अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
‘हरिजनवाडा’ नाव न बदलल्यास आंदोलन
By admin | Updated: March 4, 2015 00:46 IST