नवे पारगाव : चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्या चांदोली प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमिनी वाटप करा. जर प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी सरकारकडे जमिनी उपलब्ध नसतील, तर एकरी पंचवीस लाख रुपये द्या, अशी मागणी वारणा प्रकल्प धरणग्रस्त एकीकरण समितीचे सचिव गणपत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.चांदोली धरण व अभयारण्यामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी वाठार (ता. हातकणंगले) येथे आयोजित पत्रकार परिषदेत गणपत सोनवणे बोलत होते.ते म्हणाले, चांदोली प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या सात गावांतील ८७९ कुटुंबांपैकी फक्त २०८ कुटुंबांना जमिनी मिळाल्या आहेत. ६७१ कुटुंबांना अद्याप जमिनी मिळालेल्या नाहीत. जमिनी उपलब्ध होणार नसतील, तर आजच्या बाजारभावाप्रमाणे लाभार्थ्यांना एकरी पंचवीस लाख रुपये द्यावेत. प्रत्येक लाभार्थ्याला दहा हजार घरबांधणी विशेष अनुदान व उदरनिर्वाह भत्ता ४०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये मिळावेत, प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना वर्ग ३ व ४च्या पदावर शासकीय सेवेत प्रथम प्राधान्याने नोकरी मिळावी, प्रकल्पग्रस्तांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मोफत स्टॉल द्यावेत, नोकरी न दिल्यास दरमहा दोन हजार रुपये बेकारभत्ता मंजूर करावा, चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली असून, सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी १४ विकासकांकडून निविदा स्वीकारल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे.या परिषदेकरिता धरणग्रस्त एकीकरण समितीचे शामराव कोठारी, काशिनाथ सोनवणे, दादू सोनवणे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
जमिनी उपलब्ध नसतील, तर एकरी पंचवीस लाख द्या
By admin | Updated: March 16, 2015 00:25 IST