लोकमत न्यूज नेटवर्क / खोची : महापुराने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या बाबतीत सरकारने एकटे पाडले आहे. जनमताच्या दबावाने सरकार निर्णय बदलते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. सरकारने वाढीव भरीव नुकसान भरपाई दिली नाही तर गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.
पूरग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी खोची येथे वारणाकाठच्या १७ गावांतील शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वडगाव बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रतिगुंठा उसाला १३५, इतर खरीब पिकांना ६८ रुपयांची नुकसान भरपाई ही अत्यंत तोकडी आहे. खराब झालेल्या पिकाच्या शेतीची स्वच्छता करण्यासाठी याच्या दुप्पट खर्च येणार आहे. नुकसान भरपाईसंदर्भातील निर्णय नाही बदलला तर महागात पडेल. शेतकऱ्यांनी हातातील काम सोडून २३ तारखेच्या मोर्चात सहभागी होऊन आपली संघटित शक्ती दाखवावी.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सरचिटणीस शिवाजी पाटील, सरपंच जगदीश पाटील, संदीप कारंडे, अप्पासाहेब एडके, प्रकाश पाटील, रामचंद्र मगदूम, अमरसिंह पाटील, सुरेश शिर्के, सुनील देसाई, संपतराव पवार, अण्णासो मगदूम, बाबूराव बाबर, राजकुमार मगदूम, दिनकर घाडगे, दादासो पाटील, अक्षय देसाई, महावीर चौगुले, आदी उपस्थित होते.
चौकट- १) भाजपने सोयाबीनचे दर कमी केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही. त्यांच्याबरोबर मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील सत्ताधारी यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मी शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबतच कायम राहणार आहे, असे शेट्टी म्हणाले.
फोटो ओळी-
खोची येथे वारणाकाठच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप कारंडे, जगदीश पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र मगदूम, वैभव कांबळे उपस्थित होते. (छाया-आयुब मुल्ला)
१७ खोची राजू शेट्टी