कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लावताना ‘प्लँचेट’ विधी करून पोलिसांनी मारेकरी शोधण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले आहे. त्याबाबत माहिती घेत आहे. या प्रकरणात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, मंगळवारी येथे सांगितले. कोल्हापुरात आॅगस्टमध्ये होणाऱ्या ‘सतेज यूथ फेस्ट’ची माहिती देण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, ‘प्लँचेट’ प्रकरणाची माहिती घेत आहे. ज्या पत्रकाराने या विधीचे प्रकरण बाहेर काढले आहे, त्याने शासनाला पुरावे द्यावेत. त्यादृष्टीने तपासणी, चौकशी केली जाईल. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत शासनाने वेळोवेळी भूमिका जाहीर केली आहे. ‘सीबीआय’द्वारे सध्या तपास सुरू आहे. त्याला महाराष्ट्र पोलीस पूर्णपणे मदत करत आहेत. कोल्हापूरमधील इचलकरंजीत जात पंचायत प्रकरणाबाबत संबंधित युवकांकडून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. हे प्रकरण स्वत: जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा पाहत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीबाबत मंत्री पाटील म्हणाले, पाऊस लांबत असल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद होत आहे. त्याच्या उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. उपलब्ध पाणी साठा काटकसरीने आणि योग्य वापरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गरज लागेल त्याठिकाणी टँकरची सुविधा पुरविण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. शासनाने आणेवारी बदलाची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)
तथ्य आढळल्यास ‘प्लँचेट’प्रकरणी कारवाई
By admin | Updated: July 9, 2014 01:02 IST