कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्ती संवर्धनाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांचे पथक रात्रीचा दिवस करत आहे. दिवसातले तब्बल १३ तास ही मंडळी मूर्तीवर संवर्धनाचे काम करत आहेत. सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीला सहस्त्र तुलसीपत्र अर्पण करण्यात आले. जगदंबेच्या घोषात सहस्त्रचंडी महानुष्ठानाची पूर्णाहुतीने सांगता झाली. वाद आणि निधीच्या घोळामुळे अंबाबाई मूर्ती संवर्धनाच्या कामाला दोन दिवस उशिरा सुरुवात झाली आहे. शनिवारी मूर्तीच्या नोंदीनंतर रविवारपासून प्रत्यक्ष मूर्ती संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. संवर्धनासाठी पुरातत्त्व खात्याचे पथक सकाळी ९ वाजता गाभाऱ्यात दाखल होते ते रात्री दहा वाजताच बाहेर येते. मूर्तीवर रोज काय प्रक्रिया केली जाते हे मध्येच सांगण्यात येणार नाही. मात्र, मूर्तीसंबंधीचे सर्व कुलाचार, सात्विकता आणि पावित्र्यता जपत अतिशय श्रद्धेने हे काम केले जात असल्याचे श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी मंदिराच्या मुख्य शिखरावर भगवी धर्मध्वजा फडकाविण्यात आली. यज्ञमंडपातील मुख्य विधींअंतर्गत १०० पाठांचे हवन तसेच तर्पण करण्यात आले. कोहाळारूपी राक्षसाचा बळी देण्यात आला. यावेळी कोल्हापुरातील ब्रह्मवृदांना संभावना व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच श्रीसूक्ताचे जप करण्यात आला. वरदलक्ष्मी व मंदार मुनीश्वर आणि चित्रा व आशुतोष कुलकर्णी यांनी सहस्त्रचंडीचे यजमानपद भूषविले तसेच श्री यंत्रास अनिल गोटखिंडीकर यांच्या हस्ते कुंकुमार्चन करण्यात आले.सुप्रसिद्ध प्रवचनकार व लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी यज्ञस्थळी भेट देऊन संपूर्ण धार्मिक विधींची, मूर्ती संवर्धनासंबंधीची माहिती घेतली. त्यासंदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी देवी भागवताच्यावेळी घोडजकर गुरुजी यांनी सुदर्शन आख्यान सांगितले. या आख्यानामध्ये भक्तिमार्गाचे महत्त्व विशद केले भाविकांनी या आख्यानाचा लाभ घेतला. अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेंतर्गत सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला सहस्त्र तुलसीपत्र अर्पण करण्यात आले. आजचे कार्यक्रम सकाळी : श्रीसूक्त हवन दुपारी ४ वाजता : देवी भागवत निरूपणसंध्याकाळी ७ वाजता : भारती वैशंपायन यांचे शास्त्रीय गायन
मूर्ती संवर्धनाचे काम १३ तास...
By admin | Updated: July 28, 2015 01:23 IST