इचलकरंजी : शहरातील आर. पी. रोडवरील दोघा अडत व्यापाऱ्यांवर आयकर खात्याच्या पथकाने छापे टाकल्याने सूत व कापड बाजारात जोरदार खळबळ उडाली. व्यापाऱ्यांच्या पेढीवरील हिशोबाच्या कागदपत्रांची व संगणकावरील नोंदीची तपासणी सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. आर. पी. रोडवरील भरवस्तीत या अडत व्यापाऱ्यांच्या फर्म आहेत. दोन्हीही व्यापारी येथील यंत्रमाग कापड खरेदी करून ते राजस्थानमधील पाली, बालोत्रा येथे पाठवितात. महिन्याला काही करोडो रुपयांची उलाढाल त्यांच्या फर्मवर होते. आज, शनिवारी सकाळी आयकर खात्याच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाचवेळी दोघांकडे छापे टाकले. अधिकाऱ्यांनी हिशोबाच्या कागदपत्रांची तपासणी तसेच संगणकावरील नोंदीचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, दोघेही व्यापारी नातलगाच्या लग्नासाठी राजस्थानला गेल्याचे समजते. इचलकरंजी बरोबरच हे व्यापारी कापड पाठवित असलेल्या पाली-बालोत्रा येथील पेढ्यावरसुद्धा याचवेळी तेथील आयकर पथकाने धाड टाकल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इचलकरंजी व पाली-बालोत्रा या ठिकाणच्या कापड खरेदी विक्रीच्या नोंदीवरून या चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत आयकरचे छापे
By admin | Updated: February 8, 2015 00:48 IST