लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या थकीत रकमेसह वाढीव बिले दिल्याने मिळकतधारकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यापाठोपाठ जानेवारी, फेब्रुवारीमध्ये चतुर्थ वार्षिक कर आकारणीची दहा टक्के वाढीव रकमेनुसार घरफाळ्याची बिले नागरिकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात मिळकतधारकांचे नगरपालिकेच्या घरफाळा, पाणीपट्टीसाठीचे बजेट कोलमडणार आहे.
नियमानुसार नगरपालिकेला प्रत्येक चार वर्षांनंतर मिळकतींची मोजणी करून चतुर्थ वार्षिक कर आकारणी किमान दहा टक्के वाढीव दराने करावी लागते. याआधी सन २०१६-१७ साली मोजणी झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे एक वर्ष अंतर पडले. त्यामुळे यंदा मोजणी सुरू केली. या मोजणीचा १ ते १३ वॉर्डांतील पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामध्ये २४ हजार मिळकतींची मोजणी झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १४ ते २६ वॉर्डांतील मोजणी सुरू झाली असून, त्यातील सहा हजार मिळकतींची मोजणी झाली आहे. आजतागायत शहरातील ३० हजार मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील अद्याप २२ हजार मिळकतींची मोजणी बाकी आहे. ती साधारण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर हरकती, सूचना व सुनावणी होऊन नवीन दहा टक्के वाढीव बिले जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागू केली जातील. मार्च २०२२ पर्यंत त्याची वसुली नगरपालिकेला करावी लागणार आहे. एकूणच घरफाळा व घनकचरा व्यवस्थापन अशी दोन्ही वाढीव बिले या आर्थिक वर्षातच आल्याने सामान्य मिळकतधारकांचे बजेट कोलमडणार आहे.
चौकटी
वसुलीसाठी तारेवरची कसरत
महापूर, लॉकडाऊन, महापूर अशा आपत्तींमुळे वस्त्रोद्योगासह सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच महागाईने जगणे मुश्कील बनले आहे आणि पुन्हा वाढीव करामुळे आणखी एक अडचण वाढणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या करवसुली विभागाला वसुलीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मोजणीसाठी ८८ जणांचे पथक
शहरातील एकूण ५८ हजार मिळकतींच्या मोजणीसाठी ४४ क्लार्क व ४४ कर्मचारी असे ८८ जणांचे पथक कार्यरत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यातील काही कर्मचारी अन्य कामांकडे वर्ग झाल्याने मोजणीच्या कामात व्यत्यय येतो. सण संपल्यानंतर पुन्हा नियमित काम सुरू होते.