दोन दिवसांत होणार निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी नागरीक मंचच्या पुढाकाराने व्यापारी संघटना व प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापा-यांनी आमची सहनशीलता संपली असून एक दिवसाआड किंवा रोज ४ तास व्यवसाय करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून आणि नियम लावून हा विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याबाबत प्रथम चर्चा झाली. यावेळी व्यापा-यांनी गेली ७० दिवस प्रशासनास सहकार्य केले आहे. आता आमची सहनशीलता संपली आहे. आम्हास एक दिवसाआड किंवा रोज ४ तास व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी ठाम भूमिका घेतली. प्रशासन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत मागण्या प्रभावीवणे पोहोचवत असून बैठकीचे आश्वासन दिले. व्यापा-यांवर कारवाई करून किंवा गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. तसेच दोन दिवसांत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, अप्पर तहसीलदार शरद पाटील, उपमुख्यअधिकारी केतन गुजर, पोलीस अधिकारी श्रीकांत पिंगळे, गजेंद्र लोहार व सदस्य उपस्थित होते.