इचलकरंजी : शहरवासीयांसाठी बुधवार हा दिवस पुन्हा एकदा दिलासादायक ठरला आहे. दिवसभरात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही तसेच मृत्यूची संख्याही शून्यावर होती. सध्या केवळ दहा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास लवकरच शहर कोरोनामुक्त होण्याची आशा आहे.
कोरोनाची पहिली लाट ओसारतेच तोपर्यंत दुसऱ्या लाटेने धडक दिल्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले होते. अशातच महापूर आल्याने नागरिकांना दुहेरी संकटांशी सामना करताना जीव मेटाकुटीला आला होता. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर सोमवारी (दि.१३) सहा महिन्यांनंतर पहिल्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यानंतर दररोज साधारण एक ते दोन रुग्ण आढळत होते. बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांसाठी निश्चितच दिलासादायक आहे. परंतु तहीही खबरदारीने वागणे गरजेचे आहे. गणेशोत्सव झाला असून, येत्या काही दिवसांत नवरात्र सुरू होणार आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शहरात आजतागायत नऊ हजार ५६३ जणांना लागण झाली आहे. नऊ हजार १५० बरे झाले असून, ४०३ जणांचा मृत्यू झाला आहे.