कोल्हापूर : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना राबवून खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिली आहे. केंद्र सरकारचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी केले. कोल्हापूरची विमानसेवा, पासपोर्ट कार्यालय, सर्किट बेंच, आदी प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भाजप व लोकजनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांचा केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर ज्यांनी ६० वर्षे राज्य केले त्या कॉँग्रेसनेच आंबेडकरांना अपमानित केल्याचा आरोप करत मंत्री पासवान म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे देशभरात पसरलेले वारे कमी होईल, याची भीती होती. पण, आक्रमक कामाने मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. पाच दिवसांत पाच देशांचा दौरा करण्याचे काम केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात. मोदी म्हणजे काम आणि काम म्हणजे मोदी, अशी प्रतिमा जनतेमध्ये झाली आहे. ‘पंतप्रधान सडक योजना’, ‘शेतकरी विमा योजना’ यांसह विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला आधार दिलाच, त्याचबरोबर ज्या कॉँग्रेसने ६0 वर्षे आंबेडकरांना अपमानित केले, त्या आंबेडकरांना केंद्रातील भाजप सरकारने खऱ्या अर्थाने गौरवित केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार भूपेंद्र यादव, केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह, महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी बाबा देसाई, संभाजी जाधव, बाबासाहेब भोसले, भगवान काटे, सत्यजित कदम, उत्तम कांबळे, रवी गुरूड, आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूरच्या प्रश्नांचा केंद्राकडे पाठपुरावा करू
By admin | Updated: June 5, 2016 01:05 IST