शिरोळ : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. ५० टक्के आरक्षणामुळे प्रत्येक गावात पुरुषांपेक्षा महिलांसाठी एक जागा जास्त आरक्षित आहे. शिवाय, निवडणुकीनंतर निवडणूक लागलेल्या निम्म्याहून अधिक गावात महिला सरपंच आरक्षण असणार आहे. त्यामुळे सरपंचपदाची संधी वाया जाऊ नये, यासाठी कुटुंबातील व्यक्तीसाठी निवडणुकीची फिल्डिंग लावली जात आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत महिला आरक्षित जागेवर सौभाग्यवतींचा अर्ज दाखल करण्यासाठी पतींची धावपळ पाहायला मिळाली. त्याचबरोबर आरक्षित जागेवर आपलीच आई, भावजय यांच्या उमेदवारीसाठी कुटुंबीयांची धडपड दिसून आली. तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४२५ जागांसाठी निवडणूक होत असून यामध्ये पन्नास टक्के महिलांना कारभारी बनण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडले होते. पण महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांतूनच सरपंच निवडण्याचे धोरण राबविले जात आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाची तारीख निश्चित झाली होती. मात्र, तत्पूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे महिला गटातून सरपंचपदाची संधी मिळावी, यासाठी कुटुंबीयांची धडपड सुरू आहे.
अर्ज छाननीनंतर १९४२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका जागेवर दोनपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अनेक गावांमधून तिरंगी, चौरंगी, बहुरंगी असे चित्र सध्यातरी पाहावयास मिळत आहे. अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.