शिरोळ : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना जयसिंगपूरजवळील धरणगुत्ती येथे घडली. अर्चना चेतन घोरपडे (वय २५, रा. जयप्रकाश हौसिंग सोसायटी) असे तिचे नाव आहे. खुनानंतर पती चेतन मनोहर घोरपडे (वय ३०) याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सकाळी अकराच्यासुमारास घडली. याबाबतची तक्रार वासंती प्रकाश पुजारी (रा. विजयसिंहनगर, शिरोळ) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, मूळची शिरोळ येथील असलेली अर्चना हिचा जयसिंगपूर येथील चेतन घोरपडे याच्याशी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तीन वर्षांपासून दोघेजण जयप्रकाश हौसिंग सोसायटी येथील श्रीकांत जाधव यांच्या घरी भाड्याने राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. या वादातूनच अर्चना दहा दिवसांपूर्वी शिरोळला माहेरी गेली होती. शनिवारी सकाळी औद्योगिक वसाहतीत कामावर ती गेली होती. तिला चेतन आपल्या घरी घेऊन गेला होता. मोबाईल चार्जरच्या वायरने तिचा गळा आवळला. त्यानंतर ब्लेडने हाताची नस कापून गळ्यावरदेखील वार केल्यामुळे अर्चना जागीच ठार झाली. संशयित चेतन हा काकासोबत जयसिंगपूर पोलिसांत आल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. संशयित चेतन याच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.
चौकट - अर्चनाचा घात
चेतन व अर्चना यांच्यामध्ये वाद सुरू होते. यामुळे ती माहेरी गेली होती. तेथूनच ती जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीत कामावर जात होती. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर आली होती. कामावरून तिला घरी नेऊन चेतनने तिचा खून केला आणि यातच तिचा घात झाला.
फोटो - २००२२०२१-जेएवाय-०२-संशयित चेतन घोरपडे, मृत अर्चना घोरपडे