कोल्हापूर : ‘हम भारत की नारी है, फूल नही चिंगारी है’, ‘बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देत शेकडो युवतींनी आज, मंगळवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये युवतीवर बलात्कार झाल्याच्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील स्त्रियांवरील अत्याचार कमी होत नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज शेकडो युवतींनी हातात काठी घेऊन ‘मी ताराराणी’ अशा घोषणा देत प्रमुख मार्गांवर संचलन केले. भवानी मंडप येथून या संचलनास सुरुवात झाली. सुरुवातीला शिवाजी पेठ येथील मुलींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून सर्वांना थक्क केले. तसेच महिला शक्तीचे सामर्थ्य दाखविले त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत हातात काठी घेऊन मुलींचे शहरातून संचलन सुरू झाले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे, महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. बी. लोहार, शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे, ताराराणी संरक्षण दलाच्या निमंत्रक कविता जांभळे व वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमोक्रॅटिक यूथचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांची प्रमुख उपस्थिती होेती. भवानी मंडप येथून आज सकाळी ११ वाजता संचलन सुरू झाले. यावेळी घोषणा देत व काळी पट्टी लावून सहभागी युवतींनी महिला आपला निषेध व्यक्त केला. दसरा चौक येथे राष्ट्रगीताने संचलनाची सांगता झाली. यावेळी कस्तुरी रोकडे, रेश्मा पाटील, सुषमा पाटोळे, मानसी पोतदार, ज्योती रजपूत, नेहा शिंदे, नाईला खान, सीमा पाटील, रूपा रोकडे, सुप्रिया पाटील, मनौती पोवार, महाराष्ट्र हायस्कूलचे शिक्षक प्रदीप साळुंखे, एस. एस. मोरे, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )सहभागी शाळा व महाविद्यालये..... राजमाता गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज, पद्माराजे हायस्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल, नूतन मराठी हायस्कूल, राजाराम कॉलेज, गोखले कॉलेज, शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, कमला कॉलेजमधील विद्यार्थिनी यावेळी सहभागी झाल्या होत्या.
शेकडो युवतींनी पुकारला अत्याचारांविरोधात एल्गार
By admin | Updated: December 16, 2014 23:51 IST