कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गर्भगळीत झालेल्या शहरवासीयांनी सोमवारी भर उन्हात महानगरपालिकेच्या सर्वच नागरी आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी तुफान गर्दी केली. काही केंद्रांवर वादावादी, धक्काबुक्की झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खूपच मनस्ताप झाला. लस राहिली दूर, रांगेतच कोरोनाची लागण व्हायची, असे चित्र सगळीकडे दिसले.
गेले दोन-तीन दिवस शहरातील नागरी केंद्रावरील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लसी संपल्या होत्या. त्यामुळे लस मिळेपर्यंत सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. रविवारी कोव्हिशिल्डचे आठ हजार डोस मिळाले. महापालिका प्रशासनाने फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी लसीकरण सुरू ठेवण्यात येईल, असे जाहीर केले होते. तरीही पहिला डोस घेणाऱ्यांनीही केंद्राबाहेर गर्दी केल्याने गोंधळ उडाला.
शहरातील फिरंगाई रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय तसेच आयसोलेशन रुग्णालय येथे सोमवारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेनऊ वाजता तर अकरा लसीकरण केंद्रांवर तुफान गर्दी झाली. लोक रांगेत होते. लसीकरणाला सुरुवात झाली आणि पुढे जाण्यावरून वाद व्हायला लागले. माझा आधी नंबर यावा यासाठी प्रत्येक जण चढाओढ करत राहिले. परिणामी गोंधळ उडाला.
आयसोलेशन, फिरंगाई यासह अन्य काही केंद्रांसमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ज्या ठिकाणी मोठी गर्दी होती, तेथे वादावादी, धक्काबुक्की होत राहिली. केंद्राबाहेर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तरीही गोंधळ काही शांत होत नव्हता. फक्त दुसऱ्या डोसच्या नागरिकांनीच रांगेत थांबावे, अन्य नागरिकांनी गर्दी करू नये, असे केंद्रातील कर्मचारी वारंवार स्पीकरवरून जाहीर करत होते. सुमारे तासाभरानंतर कोठे सुरळीतपणा आला.
-सोशल डिस्टन्सचा बोजवारा-
कोरोना संसर्गाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, सोशल डिस्टन्स राखा, असे आवाहन केले जाते. परंतु, महापालिकेच्याच लसीकरण केंद्राबाहेर एवढी प्रचंड गर्दी उडाली, त्यामुळे सोशल डिस्टन्सचे भान कोणालाच राहिले नाही. नागरिक ढकलाढकली करत असताना रांगेतसुद्धा एकमेकांना चिकटून उभे होते. सोशल डिस्टन्सचा पार फज्जा उडाला.
‘आयसोलेशन’बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत रांग
सोमवारी सर्वाधिक गर्दी ही आयसोलेशन व फिरंगाई रुग्णालयाबाहेर होती. आयसोलेशन बाहेरील रांग तर मुख्य रस्त्यापर्यंत आली होती. विशेष म्हणजे सोमवारी प्रचंड उष्मा होता आणि कडकडीत उन्हात नागरिक रांगेत चार-पाच तास थांबून होते.
-ज्येष्ठ नागरिकांची दमछाक -
सोमवारच्या रांगेत अनेक ज्येष्ठ नागरिक ताटकळत उभे होते. त्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यांच्या बसण्याची सोय करताना केंद्रातील कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली होती. नागरिकांना समजावताना कर्मचारी, पोलीस यांनाही नाकीनऊ आले.
‘सावित्रीबाई’मध्ये टोकन-
सावित्रीबाई फुले रुग्णालयात नागरिकांना टोकन देण्यात आले. तीनशे लोकांना टोकन दिल्यानंतर सर्वांना घरी जाण्यास सांगण्यात आले. टोकन पद्धतीमुळे येथे लसीकरण व्यवस्थित पार पडले, गोंधळ उडाला नाही. ज्यांना लस मिळणार नाही, अशांनी तेथून काढता पाय घेतला.
(फोटो स्वतंत्र देत आहे.)