कोल्हापूर : जिल्ह्यातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळा, रुग्णांलयांनी एचआरसीटी तपासणीचे मशीनच्या प्रकारानुसार निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावावेत. त्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी मंगळवारी दिला.
कोराेनाचा प्रादुर्भाव सध्या वाढत असून, रुग्ण परस्पर डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला न घेता प्रयोगशाळेमध्ये जाऊन एचआरसीटी व अन्य तपासण्या करून घेत आहेत. शासनाने मशीनच्या प्रकारानुसार चाचणीचे दर निश्चित केले असून, ते रुग्ण व नातेवाईकांना समजावेत यासाठी प्रयोगशाळा व रुग्णालयांनी तपासणीचे दर दर्शनी भागात लावावेत. यासह या रुग्णांची आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजेन चाचणी केली जाईल, याबाबतची खात्री करावी, नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय एक्सरे तपासणी करण्यात येऊ नये. तसेच अहवालावर कोणत्या मशिनव्दारे तपासणी केले आहे, हे नमूद करणे बंधनकारक आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. साळे यांनी दिला आहे.
---------
मशीनच्या प्रकारानुसार एचआरसीटी टेस्टचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यात २ हजार रुपये, अडीच हजार व तीन हजार रुपये असे दर शासनाने ठरवले आहेत.
--