आजरा : आजरा तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांचे वाढीव मानधन कपात करून दिले आहे. माझे कुटुंब - माझी जबाबदारी याचे एक महिना सर्व्हे करूनही चार ते पाच दिवसांचे मानधन मिळाले आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे मानधन अद्याप दिले नाही. मग आम्ही जगायचे कसे, असा सवाल करीत आशा स्वयंसेविकांचे मानधन तातडीने द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे यांच्याकडे केली आहे.
आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत काम करीत असताना त्यांच्याकडे कायमपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना वेळेत मानधन दिले जात नाही. कोरोना काळात अशा स्वयंसेविका यांनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता काम केले आहे. काम करूनही महा आयुष्य सर्व्हे मानधन जमा केले नाही. ओडीएफ सर्व्हे मानधन जमा केलेले नाही. अशा स्वयंसेविकांना फक्त कामच सांगितले जाते. मानधन मात्र दिले जात नाही. आशांना सध्या कोरोना लसीकरणाचे काम दिले आहे. ऑक्सिजन तपासणीचे काम करताना स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून काम केले आहे. असे असतानाही आरोग्य विभाग आमचे मानधन देत नसेल तर आशा स्वयंसेविकांकडून कामाची अपेक्षा का करता. मानधन मिळत नसेल तर आम्ही जगायचे कसे, असा सवालही निवेदनातून केला आहे. मागणीचे निवेदन आशा स्वयंसेविका संघटनेच्या आजरा तालुका अध्यक्षा मंदाकिनी कोडक यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांना दिले आहे.
फोटो कॅप्शन : आशा स्वयंसेविकांचे मानधन तातडीने मिळावे या मागणीचे निवेदन डॉ. यशवंत सोनवणे यांच्याकडे देण्यात आले.