कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी लक्षाधीश असल्याचे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांची मालमत्ता सध्या कोट्यवधींची आहे. पाच वर्षांपूर्वी जेमतेम ६४ लाख रुपयांची असणारी त्यांची मालमत्ता आता चार कोटी रुपये असल्याचे आकडेवारी सांगते, असा कोणता उद्योग विद्यमान आमदारांनी केला ज्यामुळे त्यांची संपत्ती चौपट झाली. त्यांना कोणता खजिना सापडला, अशी विचारणा नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी केली आहे. ‘कोल्हापूर उत्तर’मधील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ कसबा बावडा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.गायकवाड म्हणाले, क्षीरसागर यांनी २००९ मध्ये ६४ लाख ५ हजार रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. त्यांच्या व पत्नीच्या नावे १९ लाख ७० हजार रुपयांची जंगम मालमत्ता होती, तर ४४ लाख ३५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली होती. रोख रक्कम साडेतीन लाख तर ठेवी १ लाख १९ हजार रुपयांंच्या होत्या. वाहनांची किंमत ७ लाख १५ हजार तर दागिने सव्वापाच लाख रुपयांचे होते. आठ लाख रुपयांचे कर्ज असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात होता.क्षीरसागर यांचा किंवा त्यांचा पत्नीचा कोणताही उद्योग-व्यवसाय दिसून येत नाही. कागदोपत्री काहीतरी व्यवसाय दाखविला आहे, असे असतानाही चार कोटींची संपत्ती कशी झाली? गेल्या पाच वर्षांत जंगम मालमत्ता दोन कोटी ७९ लाख रुपयांची झाली. लाखभराच्या ठेवी २३ लाखांच्या झाल्या. ही समृद्धी कुठून आली? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.क्षीरसागर कुटुंबाकडे २००९ मध्ये बुधवार पेठेतील वडिलोपार्जित घर, पत्नीच्या नावे मौजे खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथील शेत, जमीन व कदमवाडी येथील एक प्लॉट इतकीच स्थावर मालमत्ता होती. आता मौजे आंबवडे (ता. पन्हाळा) येथे मोक्याच्या जागी भूखंड, पवई (मुंबई) येथे फ्लॅट, कसबा बावडा येथे बंगला, मौजे ताथवडे (ता. मुळशी) येथील आलिशान फ्लॅट, असे सहा फ्लॅट क्षीरसागर कुटुंबीयांच्या नावे आहेत. मोक्याच्या जागी नऊ मिळकती आहेत. कोणताही उद्योग-व्यवसाय नसताना कागदोपत्री इतकी प्रचंड मालमत्ता उभी राहते ही जादू समजायची की तोडपाणी आणि मांडवलीचा उद्योगातून भ्र्रष्ट मार्गाने संपादित केलेली संपत्ती समजायची, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.स्कोडा, फॉर्च्युन..चा ताफाच..क्षीरसागर यांच्याकडील वाहनांची किंमत सात लाखांवरून पाऊण कोटींवर गेली. ‘फॉर्च्युन’, ‘इनोव्हा’, ‘स्कोडा’, ‘मारुती’, ‘जिप्सी’, ‘बुलेट’,केस कंपनीचे ७७० एमएम मॉडेल, २०१२ चे १९ लाखांचे मॉडेल असा क्षीरसागर यांच्या वाहनांचा ताफा आहे. विरोधी पक्षांतील आमदार असतानाही त्यांनी ही मालमत्ता घेतली कशातून, हे जाहीर करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. जयललितांचा भाऊउद्योग व्यवसाय नसताना मिळवलेली ही संपत्ती भ्रष्ट आहे. त्याची नि:पक्षपणे पोलीस चौकशी झाल्यास या महोदयांच्या हाती बेड्या पडतील. तमिळनाडूच्या जयललिता यांना अशाच बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात जावे लागले आहे. क्षीरसागर हे जयललिता यांचे छोटे भाऊ आहेत, अशी उपहासात्मक टीकाही गायकवाड यांनी या सभेत केली.
क्षीरसागर कोट्यधीश कसे ?
By admin | Updated: October 8, 2014 00:29 IST