कोल्हापूर : महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असूनही घरफाळा विभागात मोठा अनागोंदीपणा सुरू आहे. मिळकतींचे सर्वेक्षण पारदर्शीपणे होत नाही. त्याचा ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांत आढावा घेतला. त्याची दखल घेत, महापौर तृप्ती माळवी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना घरफाळ्याच्या पाचही वॉर्डांतील गेल्या पाच वर्षांतील सर्व आढावा देण्याची मागणी बुधवारी पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर या विभागाचा पंचनामा केला जाणार आहे.उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असूनही घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना प्रतिसाद दिला जात नाही. शहरातील अनेक इमारतींची करआकारणी वेळेत व पारदर्शीपणे झालेली नाही तसेच अनेक नवीन इमारतींना घरफाळाच लागू झालेला नाही. ‘मागणीनुसार तुटक करून देणे,’ अशी तांत्रिक उत्तरे देत मिळकतधारकांची अडवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. घरफाळ्यातील अनेक मिळकतींना दंडात परस्पर सवलत दिल्याचे प्रकारही घडले आहेत. मागणीपेक्षा कमी रक्कम भरून घेत, महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. सन २०१०-११ ते २०१४-१५ पर्यंत कालावधीतील घरफाळा विभागाकडून ए, बी, सी, डी व ई वॉर्डात कोणकोणत्या रहिवासी तसेच व्यापारी मिळकतींना दंड व्याजात सूट दिली आहे तसेच घरफाळ्यात इतर कारणांनी सूट देण्यात आलेली आहे. याची माहिती मिळकतधारकाचे नाव, पत्ता, मिळकत क्रमांक व एकूण थकबाकीत देण्यात आलेली सूट, तसेच ही सूट कोणाच्या आदेशाने देण्यात आली, त्याची सविस्तर लेखी माहिती देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. महापौरांनी घरफाळ्यातील घोटाळ्यात लक्ष वेधल्याने प्रशासन माहिती संकलनाच्या कामास लागले आहे.
पाच वर्षांपासूनच्या घरफाळा तपशिलाची पाहणी होणार
By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST