कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) आज, सोमवारी सामुदायिक रजा आंदोलन केले. त्याला शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनामुळे काही महाविद्यालयांमध्ये तास ‘आॅफ’ (बंद) राहिले. मात्र, परीक्षेचे कामकाज सुरू असल्याचे चित्र होते. सुमारे दोन हजार प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाल्याचे ‘सुटा’तर्फे सांगण्यात आले.नेट-सेटमुक्त शिक्षकांबाबतीत १८ नोव्हेंबर २०१३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, विद्यापीठाने निर्गमित केलेल्या ‘कारणे दाखवा नोटिसा’ मागे घ्याव्यात, अशा विविध प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्र्यांनी वारंवार लेखी आश्वासने देऊन काहीच कार्यवाही झालेली नाही. राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम्फुक्टो) स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. ‘सुटा’ सदस्य असलेले बहुतांश प्राध्यापक यात सहभागी झाले. काही महाविद्यालयांनी प्राध्यापक रजेवर असल्याने तास होणार नसल्याची नोटीस फलकांवर लावली होती. काही महाविद्यालयांत तास ‘आॅफ’ आणि परीक्षा सुरू असल्याचे चित्र होते. तासच होणार नाहीत, हे समजल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ग्रंथालय गाठले, तर काहींनी घरी जाण्याचा पर्याय निवडला. दरम्यान, आंदोलनात हंगामी, सीएचबी, तसेच सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात असलेले प्राध्यापक सहभागी झाले नव्हते. तीव्रता वाढविणार ‘एम्फुक्टो’च्या नेतृत्वाखाली राज्यात टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. आजच्या आंदोलनात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे दोन हजार प्राध्यापक सहभागी झाले. आंदोलनाची तीव्रता यापुढे वाढविण्यात येईल. १५ डिसेंबरला ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन केले जाईल.- रघुनाथ ढमकले (जिल्हा अध्यक्ष, सुटा)
तास ‘आॅफ’, तर परीक्षा सुरू : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चित्र
By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST