कागल : येळ्ळूर येथे कर्नाटक शासनाने सीमाभागातील मराठी जनतेवर केलेल्या पोलिसी अत्याचारांच्या निषेधार्थ आज, बुधवारी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे-बंगलोर महामार्ग अडवला आणि कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.येथील नगरपालिकेसमोर सर्व कार्यकर्ते एकत्र जमले. तेथून शहराच्या मुख्य मार्गावरून गैबी चौकापर्यंत निषेध फेरी काढली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते शहरालगत महामार्गावरील जोडपुलाजवळ आले. तेथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठिय्या मांडून महामार्ग रोखण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैया माने यांनी कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध करीत प्रसंगी आंदोलन तीव्र करून कागल परिसरातील जनता सीमाभागातही घुसेल आणि तेथील मराठी माणसांना पाठबळ देईल, असा इशारा दिला. या ठिकाणी पक्षप्रतोद रमेश माळी, पांडुरंग सोनुले, नगरसेविका नम्रता कुलकर्णी, प्रवीण गुरव, आदींची भाषणे झाली. पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात शहर अध्यक्ष रघुनाथ जकाते, नगराध्यक्षा आशाकाकी माने, अजित कांबळे, इरफान मुजावर, संजय चितारी, गणेश कांबळे, सुमन कुऱ्हाडे, राजेंद्र गोनुगडे, आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले. युवक आघाडीचे सौरभ पाटील यांनी आभार मानले.
कागलमध्ये महामार्ग रोखला
By admin | Updated: July 31, 2014 00:47 IST