कोल्हापूर : कोल्हापूरचा पंचगंगा घाटाचा प्राचीन व ऐतिहासिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षित करण्यासाठी उद्यापासून (बुधवार) सुरू होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत शहरातील सर्व तालीम, मंडळ, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते, शालेय विद्यार्थ्यांसह कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘द्या पंचगंगेसाठी २ तास’ या स्वच्छता मोहिमेला सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ होईल. पंचगंगा घाटावरील वास्तू संवर्धनासाठी महापौर सुनीता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवासराव साळोखे, टाऊन हॉल म्युझियमचे अधीक्षक अमृत पाटील, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, केदार मुनिश्वर, इतिहास संकलन समितीचे अनंत दामले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, जयकुमार शिंदे यांच्यासह इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाऊस सुरू होण्याआधी घाटाची स्वच्छता करणे आवश्यक असल्याने शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेसाठी सकाळी ७ ते १० या वेळेत योगदान द्यावे, असे आवाहन महापौरांनी केले. त्या म्हणाल्या, घाट स्वच्छतेसाठी महाापालिका युद्धपातळीवर काम करेलच मात्र रंकाळा स्वच्छतेच्या मोहिमेप्रमाणेच कोल्हापूरकरांनी या घाटाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा व आपल्यापरीने त्यात योगदान द्यावे.वसंत मुळीक म्हणाले, जोपर्यंत कोल्हापुरात हेरिटेज समिती स्थापन होणार नाही तोपर्यंत या वास्तू टिकवता येणार नाहीत. त्यामुळे तातडीने हेरिटेज समितीची स्थापना व्हावी आणि पुन्हा एकदा कोल्हापुरातील प्राचीन वास्तूंचा सर्व्हे केला जावा. इंद्रजित सावंत म्हणाले, हा घाट म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या वैदिक प्रकरणाची साक्ष देणारा परिसर आहे. छत्रपती घराण्याच्या अखत्यारित असलेल्या घाटावर राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आहेत. त्यामुळे घाटाच्या पौराणिकसह ऐतिहासिक महत्त्वही उजेडात आणले जावे. परुळेकर यांनी घाटावरील दीपमाळा आणि मंदिरांचे असलेले खगोलशास्त्रीय महत्त्व आणि किरणोत्सव, सूर्याचा उत्तरायण-दक्षिणायन प्रवासाची माहिती दिली. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या बहुतांशी तालीम मंडळांनी आमच्यापासून स्वच्छता मोहीम सुरू होईल, असे जाहीर केले. शिवाय ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे अशी साद कोल्हापूरकरांना घालण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
उच्च व तंत्रशिक्षण सचिवांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
By admin | Updated: July 2, 2014 00:49 IST