१३ जणांचा गेला बळी : गावात १८३ कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
हेरले :- हेरले (ता. हातकणंगले) येथे कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा बळी गेला असून, गावात अजूनही १८३ रुग्ण आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १० टक्के एवढे असून, गावात रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हॉटस्पॉट बनण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत व कोरोना संनियंत्रण समितीने गाव तीन दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेरले गावची लोकसंख्या २० हजाराच्या जवळपास असून दुसऱ्या लाटेत येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून प्रभागवार ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, आशा वर्कर, मेडिकल प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने गावात घर ते घर सर्वेक्षण सुरू केले. तापाच्या रुग्णांची अँटिजन चाचणी करण्याचे नियोजन केले. गावात खासगी डॉक्टर व मेडिकल प्रतिनिधी यांच्या सहकार्याने मोफत अँटिजन चाचण्या सुरू केल्या आहेत. संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थ व तरुणाईने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास गावांमध्ये कोरोनाचा विस्फोट होऊन याचे गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
प्रतिक्रिया
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गाव तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत मार्फत घर ते घर सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. गावामध्ये प्राथमिक शाळेत संस्थात्मक अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. गंभीर रुग्णांना घोडावत कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.
अश्विनी चौगुले, सरपंच, हेरले