कोल्हापूर : वाट चुकलेल्या मूकबधिर महिलेची वारांगना सखी संघटनेच्या महिला सदस्यांनी रेल्वेस्थानक परिसरातील मद्यपींच्या तावडीतून सुटका करीत सुधारगृहात रवानगी केली. यावेळी त्यांनी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व रेल्वे पोलिसांची मदत मागितली असता त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघटनेच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला. रेल्वेस्थानक परिसरात काल (सोमवार) रात्री साडेसहाच्या सुमारास तीस वर्षांच्या मूकबधिर महिलेची मद्यपी छेडछाड काढत होते. हा प्रकार वारांगना सखी संघटनेच्या राजाक्का ढोंबरे, महादेवी सोनी, संगीता पाटील, जयश्री शिनगिरी, सुरेखा राजमाने व विजय पाटील यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यांच्या तावडीतून महिलेची सुटका केली. ती मूकबधिर असल्याने तिचे नाव, पत्ता समजू शकला नाही. संघटनेच्या सदस्यांनी या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यांनी ही महिला रेल्वेस्थानक परिसरात मिळून आल्याने तुम्ही शाहूपुरी पोलिसांकडे जा, असा निरोप देऊन जबाबदारी झटकली. त्यानंतर त्या सर्वजणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी संबंधित महिलेची माहिती पोलिसांना दिली. ड्यूटीवरील ठाणे अंमलदारांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेण्यास सांगितले. या महिलांजवळ पैसे नसल्याने त्यांनी पोलिसांनाच ‘तुमच्या गाडीतून घेऊन जा’ असे सांगितले. सुरुवातीस पोलिसांनी टाळाटाळ केल्याने महिलांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. अखेर शाहूपुरी पोलिसांनी त्या महिलेची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा त्यांच्याच ताब्यात दिली व रेल्वे पोलिसांकडून दुसरीकडे पाठविण्याचा सल्ला दिला. पोलीस जबाबदारी झटकत असल्याचे लक्षात येताच त्या रेल्वे पोलिसांकडे गेल्या. तेथे तीन पोलीस होते. या महिलांना पाहून ते चौकीला कुलूप लावून बाहेर गेले. अखेर त्यांनी तिला तेजस्विनी महिला सुधारगृहात पाठविले. सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत या महिला ती मूकबधीर महिला सुरक्षितस्थळी जावे यासाठी हेलपाटे घालत होत्या. रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या वारांगणांनी माणुसकी दाखवली; परंतु पोलिसांचा अनुभव मात्र चिड आणणारा होता.
‘तिला’ मिळाला वारांगनांचा मायेचा आधार
By admin | Updated: November 26, 2014 00:44 IST