कोल्हापूर : आईच्या उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देऊन त्यातून चार कोविड केंद्रांना अन्नधान्याचे किट वाटप करण्याचा समाजोपयोगी उपक्रम येथील शिवाजी पेठेतील जगताप कुटुंबीयांनी राबवला. त्यांच्या आई प्रेमला रामचंद्र जगताप यांचे नुकतेच निधन झाले.
जगताप कुटुंबीयांचे आधारस्तंभ रामचंद्र जगताप यांनी अत्यंत हलाखीतून जीवनाची उभारणी केली. त्यावेळी ते संध्यामठ गल्लीत भाड्याने राहत होते. साधारणत: १९६५ चा तो काळ असे. आर्थिक ओढाताण होत असे म्हणून ते घरातल्या खोलीतच लोखंडी जाळ्यांना वेल्डिंग मारून देत असत. त्याकाळी ही माउली मुलांना बाहेर रस्त्यावर झोपवत असे. वेल्डिंगचे काम झाल्यावर रात्री कधीतरी तापलेल्या जमिनीवर पाणी मारून त्यावर चटई टाकून मुलांना पोटाशी घेऊन प्रेमला जगताप यांनी संसार उभा केला. त्या स्वत:ही अनेक वर्षे शिलाईकाम करून चार पैसे मिळवत होत्या. अशा कष्टाळू आईच्या निधनानंतर त्यांचे स्मरण म्हणून अरुण, विश्वजित व इंद्रजित या मुलांनी व मुलगी छाया नलवडे यांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यातून कोविड केंद्रांना तांदूळ, तेल, तूर डाळ व रुग्णांसाठी काजू, बदाम व खजूर घेऊन त्याचे वाटप केले. तुषार जगताप, सिद्धेश जगताप, कपिल नलवडे, तन्मय नलवडे, प्रणीत जगताप यांनी या साहित्याचे वाटप इंगवले कोविड सेंटर, फुलेवाडीतील राहुल माने यांचे सेंटर याशिवाय उत्तरेश्वर थाळी व सीपीआरसाठी बंडा साळोखे यांनाही मदत केली.
१९०६२०२१-कोल-जगताप मदत
कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील जगताप कुटुंबीयांनी आईच्या उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देऊन चार कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी अन्नधान्याचे किट वाटप केले.