काेल्हापूर ; जिल्ह्यात सोमवारी अधुनमधून पावसाची भुरभूर राहिली. कोल्हापूर शहरात सायंकाळनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी सुरूच आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. क्षणात पावसाच्या सरी, तर लगेच ऊन पडत आहे. दिवसभरात ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळत आहे. हा पाऊस खरीप पिकांना पोषक आहे. जेमतेम पाऊस सुरू असल्याने पिकांच्या वाढीस मदत होणार आहे. धरण क्षेत्रातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. राधानगरी धरणातून प्रति सेकंद १४००, वारणा धरणातून ८२०, तर घटप्रभा धरणातून ९०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत थोडी वाढ झाली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत थोडी वाढ झाली होती. सध्या पंचगंगा १७.५ फुटावरून वाहत असून ‘राजाराम’, ‘सुर्वे’, ‘रुई’, ‘इचलकरंजी’ हे चार बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, आज, मंगळवारपासून पाऊस वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.