कोल्हापूर : महाद्वार चौकातील फेरीवाला प्रकरणी परिसरातील व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या जिल्हा न्यायालयातील याचिकेवर पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे. महापालिकेने या प्रकरणी शनिवारी प्रतिज्ञापत्र सादर केले. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये म्हणून महाद्वार चौकातील फेरीवाल्यांसाठी पट्टे मारण्यात येत असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
महाद्वार चौकातील १०० मीटर परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी महापालिकेने निर्णय घेतला होता. तेथील फेरीवाल्यांचे १०० मीटर परिसराच्या पुढील बाजूस पुनर्वसन केले जाणार होते. याला तेथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करता, फेरीवाला झोन निश्चित न करता अशा प्रकारे फेरीवाल्यांना बसवणे योग्य होणार नाही. पूर्वीच्या आणि नवीन येणाऱ्या फेरीवाल्यांमुळे दुकानात प्रवेश करण्यास ग्राहकांना अडथळा होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर १० फेब्रुवारीस न्यायालयाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. महाद्वार रोडवर अंबाबाई मंदिर, दुकाने असल्यामुळे वाहतुकीची वर्दळ असते. यामध्ये दोन्ही बाजूंना फेरीवाले व्यवसाय करतात. व्यवसाय होण्यासाठी ते रस्त्यावर येतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पट्टे मारले आहेत. फेरीवाला कायदा आणि शासनाच्या सूचनेनुसारच काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हणणे महापालिकेने मांडले आहे. व्यापाऱ्यांनी म्हणणे मांडण्यासाठी कालावधीची मागणी केली. महापालिकेकडून ॲड. प्रफुल्ल राऊत आणि व्यापाऱ्यांकडून ॲड. किशोर नाझरे यांनी बाजू मांडली.