इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या चार प्रमुख तक्रारींवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर मंगळवारी (दि.२१) सुनावणी होणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी संबंधित प्रकरणांची कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, तसेच याचिकाकर्त्यांनीही आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या ऑनलाइन सभेत तांत्रिक अडचणींमुळे विरोधकांना सहभागी होता आले नाही. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर अनेक विषय मंजूर केले. त्याला आक्षेप घेत विरोधकांनी ३०८ लावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्राजवळील कापड विक्रेत्यांचे अतिक्रमण, मोफत पोळी-भाजी केंद्रासाठी मुख्य बसस्थानकाजवळ आनंद युवा मंचला दिलेली जागा, जुन्या नगरपालिकेतील गाळा भाड्याने देण्याचा ठराव, भुयारी गटार योजना मलशुद्धीकरण केंद्र सुधारणा प्रकल्प अहवाल या विषयांवर बैठक होणार आहे. यासंदर्भात शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्या होत्या.