कळंबा : प्रभागातील साफसफाईसाठी ६ कर्मचारी नियुक्त केले, पण आठवडाभर एकच कर्मचारी प्रत्यक्षात कामावर असल्याने प्रसारमाध्यमांसह नागरिकांचा रोष आज लोकप्रतिनिधींना पत्करावा लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक अभिजित चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी पालिकेच्या ए-२ कळंबा फिल्टर हाऊसला भेट देऊन आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. कळंबा फिल्टर हाऊस ए-२ आरोग्य विभागात पालिकेचे १२ प्रभाग येतात, परंतु प्रभागांची भौगोलिक रचना विचारात न घेताच सफाई कर्मचारी निश्चित केले आहेत. विभागातील १६४ कामगारांपैकी ११0 कामगार हजर असल्याचे दाखविण्यात आले होते. ३२ बदली कामगारांपैकी २२ हजर होते. जीवबानाना पार्क (प्रभाग ८0) कर्मचारी नियुक्त ६, पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी १ कर्मचारी हजर होता. मग बाकीचे कर्मचारी कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर देताना अधिकारी संजय गेजगे यांना घाम फुटला. कायम कामगारांनीच वेतनावर कामगार नियुक्त केलेत. रेकॉर्डवरील उपस्थिती व ओळख परेड घेतल्यास विदारक सत्यच बाहेर येईल. लोकप्रतिनिधींना सुशांत शेवाळे सॅनेटरी इन्स्पेक्टर यांनी आपण ८ दिवस रजेवर असल्याचे सांगितले. हा विभागच अर्थकारणात बरबटल्याचा आरोप विजयसिंह देसाई यांनी केला. संबंधित कार्यालयातील वाद हमरीतुमरीवर येताच मधुकर रामाणे यांनी भेट देऊन पडदा टाकला.
नगरसेवक चव्हाणांकडून आरोग्य विभागाची झडती
By admin | Updated: February 27, 2016 01:05 IST