शिरोली : टोप येथील गटक्रमांक १२७४/१ यातील सुमारे १५ हेक्टर ४१ आर. गायरान जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण कायदेशीर पूर्तता करून काढू, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी दिल्यानंतर उपोषणाला बसलेल्या अक्षय पाटील,अनिकेत गुरव, विकास पाटील तिघांनी उपोषण मागे घेतले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, सरपंच रुपाली तावडे आणि ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते उपस्थित होते. टोपच्या वेतामाळ येथील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अक्षय पाटील, अनिकेत गुरव, विकास पाटील यांनी तीन दिवसांपासून टोप ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले होते. त्याची दखल बुधवारी आमदार राजूबाबा आवळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी पोवार यांनी टोपमध्ये येऊन तरुणांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांनी शासननियमांनुसार अतिक्रमण नियामानुकुल करणे, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीने असेसमेंटला नोंदी घेतल्या आहेत त्याव्यतिरिक्त जादा असणारी मिळकत काढून टाकणे. बाहेर गावच्या अतिक्रमणधारकांची घरे काढून टाकणे. गावात घर असताना गायरानमध्ये अतिक्रमण केले असेल, तर असे अतिक्रमण काढून टाकणे, जे बेघर आहेत, त्यांना अतिक्रमणामध्ये ५०० स्के.फूट पर्यंत जागा द्यावी, अशी मागणी केली. त्यावर गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी अनधिकृत अतिक्रमणे काढून टाकतो, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तिघांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, नंदकुमार मिरजकर,भगवान पाटील, दिलीप पाटील, अमोल पाटील, दीपक पाटील, संजय कोळी, सागर पाटील, संजय शेटे, अमित पाटील, नवनाथ स्वामी उपस्थित होते.
फोटो: ०३ टोप उपोषण
टोप येथील अनाधिकृत अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या युवकांची आमदार राजूबाबा आवळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार यांनी भेट घेतली.