लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सामान्य जनतेच्या बळावर राजकारण करत असून त्या बळावरच राज्याच्या राजकारणात त्यांनी उंची गाठली आहे. अशा संकटांना ते न डगमगता सामोरे जातील, असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकातून व्यक्त केला. भाजपने किरीट सोमय्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय दहशतवाद माजवू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात राजकीय दहशतवादासाठी होत असलेला ईडीचा वापर हा लोकशाहीला घातक आहे. जनाधारावर कर्तृत्व सिद्ध केलेल्या लोकप्रतिनिधींना अशा मार्गाने संपवण्याचा नवा पायंडा पडत आहे, याचा खेद वाटतो. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात, पण जनसामान्यांतून निर्माण झालेल्या एखाद्या नेतृत्वाला संपवण्यासाठी दूषित वातावरण निर्माण करणे हे लोकशाही व्यवस्थेत लोकमताचा आदर करणारे नाही. या कृत्रिम राजकीय संकटाला मंत्री हसन मुश्रीफ हे न डगमगता सामोरे जातील. हा जिल्हा छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे. एखाद्यावर आरोप करणे म्हणजे तो गुन्हेगार होत नाही. त्यासाठी आरोप सिद्ध व्हावे लागतात. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना व महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे उघड करू अशा धमक्या देऊन ईडीचा वापर करत महाराष्ट्रात राजकीय दहशतवाद निर्माण करू नये. सत्तेसाठी आरोप करणाऱ्यांचे विचार किती खुजे आहेत, हे त्यांच्या कृतीमधून सिद्ध होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पायाचे दगड इतके भक्कम असल्याने कितीही हादरे दिले तरी त्याला इजा पोहोचणार नसल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकात म्हटले आहे.