लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तीन वर्षे रखडलेल्या लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. शासकीय विश्रामगृह परिसरात शंभरहून अधिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली.
लिंगनूर-मुरगूड-मुदाळतिट्टा-राधानगरी-फोंडाघाट हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. भाजप सरकारच्या काळात तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रस्ता हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत सुरू केला होता. गेल्या तीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेतील रखडलेला हा रस्ता वाहतुकीसाठी जीवघेणा बनला आहे. अपुऱ्या कामांमुळे अपघातांचेही प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मंत्री मुश्रीफ यांना घेराव घातला.
शिवाजीराव मगदूम-सिद्धनेर्लीकर, लिंगनूरचे सरपंच स्वप्निल कांबळे, गलगलेचे उपसरपंच सतीश घोरपडे, माजी सरपंच मयूर आवळेकर, किरण आवळेकर, प्रवीण जाधव, प्रा. सुधीर कुराडे, अक्षय चव्हाण, अभिजित जाधव, संदीप जाधव, नामदेव भोसले, प्रशांत आवळेकर, विलास भोसले, तुषार किल्लेदार, ज्ञानेश्वर पडळकर आदी उपस्थित होते.
ग्रामस्थांना तुमच्या कार्यालयात पाठवू
अर्धवट राहिलेल्या रस्त्याबद्दल ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाजताच, मंत्री मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजीराव माने यांना फोन केला. कोणत्याही परिस्थितीत या अर्धवट रस्त्याचे काम मार्गी लावा, अन्यथा तक्रार घेऊन आलेले हे सगळे ग्रामस्थ तुमच्या कार्यालयात पाठवू, असे सुनावले.
फोटो ओळी :
लिंगनूर-फोंडा अर्धवट रस्त्याच्या प्रश्नी लिंगनूर, गलगले परिसरातील ग्रामस्थांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह परिसरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना घेराव घातला. (फाेटो-०२०७२०२१-कोल-लिंगनूर)