कोल्हापूर : कारखाना उभारणीसाठी माहेरुन सहा कोटी रुपये तसेच आलिशान दुचाकी व चारचाकी वाहन आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याबद्दल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पती-सासू-सासरेसह चौघांवर गुन्हे नोंदवले. ही तक्रार सलोनी अभय जैन (वय ३५ रा. केशवपूरम, न्यू दिल्ली. सध्या रा. आयरेकर गल्ली, रंकाळा स्टॅण्ड परिसर, कोल्हापूर) यांनी तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभय चंपालाल जैन याने सलोणी यांच्याशी दुसरा विवाह केलेला आहे. त्यांना लहान मुलगाही आहे. आपण कारखाना उभारणीसाठी माहेरुन सहा कोटी रुपये तसेच आलिशान दुचाकी व चारचाकी वाहने आणावीत या मागणीसाठी मारहाण करुन त्यांचा मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार सलोनी जैन यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. ही घटना दि. ११ डिसेंबर २०२० ते २३ मार्च २०२१ या कालावधीत वेळोवेळी घडली. याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात पती अभय चंपालाल जैन, शारदा चंपालाल जैन, सासरे चंपालाल जैन (सर्व रा. केशवपूरम, नवी दिल्ली), तरुण अभिषेक शहा (रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.