इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरात रमजान सणानिमित्त लावण्यात आलेला शुभेच्छा फलक अज्ञाताने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दगड मारून फाडला. याप्रकरणी रियाज दस्तगीर मुल्ला (वय २२, रा. जवाहरनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिले.मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जवाहरनगर परिसरातील रोशन ग्रूपच्यावतीने रमजान मुबारकचा डिजिटल फलक मराठा चौक परिसरात लावण्यात आला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नमाज पठणला जाणाऱ्या मुस्लिम तरुणांना हा फलक कुणीतरी फाडल्याचे निदर्शनास आले. मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांना निवेदन देऊन डिजिटल फलक फाडून धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, अशी मागणी केली. साळुंखे यांनी परिसरात पोलीस बंदोबस्त नेमण्याचे व संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
‘रमजान’चा शुभेच्छा फलक फाडला
By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST