कोल्हापूर : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांमधून आनंद व्यक्त हाेत असून ॲलोपॅथी डॉक्टरांनी मात्र या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शुक्रवारी एक दिवस रुग्णालयेही बंद ठेवली होती. वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रिया ही अत्यावश्यक प्रक्रिया बनली असून, दोन हजार वर्षांपूर्वीपासून आयुर्वेदाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, असा दावा आयुर्वेदिक डॉक्टरांकडून केला जात आहे; तर शस्त्रक्रिया करणे ही अतिजोखमीची कामगिरी असून, सातत्यपूर्ण प्रात्यक्षिकांच्या आधारेच त्यामध्ये कौशल्य प्राप्त होते. त्यामुळे आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचा आधार देण्याचा ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा विरोध आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे आयुर्वेद डॉक्टरांचे म्हणणे आहे.
......................................
चौकट
नवीन कायद्याचा फायदा
या निर्णयामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. ग्रामीण भागातही ही सेवा रुग्णांना देता येणार आहे. त्यासाठीची परवानगी प्रशासकीय कार्यवाहीही तातडीने होणार आहे. कमी खर्चात शस्त्रक्रिया शक्य होणार आहेत.
चौकट
नवीन कायद्याचा तोटा
शस्त्रक्रिया या नाजूक आणि अभ्यासाचा, सरावाचा विषय आहे. अर्धवट अभ्यास आणि सरावाची कमतरता असेल तर अशा व्यक्तीस शस्त्रक्रियेची परवानगी देणे रुग्णाच्या जिवाशी खेळल्यासारखे होईल, असे इंडियन मेडिकल असोसिएशनला वाटते.
चौकट
आयुष डॉक्टरांकडून निर्णयाचे स्वागत
हा अधिकार बीएएमएस डॉक्टरांना नाही, तर तीन वर्षांचा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या एमएस किंवा एमडी डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी मिळाली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यासाठी ‘आयएमए’चा विरोध चुकीचा आहे. आम्ही या निर्णयाबाबत केंद्र सरकारचे अभिनंदन करतो.
डॉ. शिवानंद पाटील, अध्यक्ष, निमा, कोल्हापूर
चौकट
या निर्णयाला विरोध
ॲलोपॅथी हे आधुनिक वैद्यकीय शास्त्र आहे. प्रत्येकाचे अभ्यासक्रम वेगळे आहेत. त्याची निदान पद्धती, उपचार पद्धती वेगळी आहे. अशा परिस्थितीत अपुरे ज्ञान व शल्यकौशल्य असताना कठीण शस्त्रक्रिया करण्याची संमती देणे म्हणजे जीवन धोक्यात आणण्यासारखे होईल; म्हणून आमचा विरोध आहे.
डॉ. आबासाहेब शिर्के, अध्यक्ष, आएएमए. कोल्हापूर
कोट
कोणतीही शस्त्रक्रिया ही ॲलोपॅथीची मक्तेदारी नाही. हा कौशल्याचा भाग आहे. आयुर्वेदामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत ही शस्त्रक्रियेची शाखा कार्यरत होती. १९३९ च्या आधीही आयुर्वेदातील ॲलोपॅथीशी संबंधित भाग शिकवण्यासाठी संबंधित डॉक्टर येत होते. विज्ञानाच्या क्रांतीमुळे शस्त्रक्रियांचे स्वरूप बदलले. हे केवळ एक कौशल्य आहे.
डॉ. सुनील पाटील, माजी राज्य अध्यक्ष, निमा
कोट
आयुर्वेदाला शस्त्रक्रिया नवीन नाही. हजारो वर्षांपूर्वी शस्त्रक्रियांचा उल्लेख आहे. वेगवेगळ्या आक्रमणांच्या काळात आयुर्वेदाची शाखा मागे पडली. कोणतीही कौशल्ये ही प्रशिक्षण आणि सरावानेच आत्मसात होत असतात. अशी कौशल्ये आयुर्वेदिक डॉक्टरही आत्मसात करीत आहेत. त्यामुळे याला विरोध हाेण्याचे कारण नाही.
- डॉ. विवेक हळदवणेकर
कोट
आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ही दोन्ही शास्त्रे आहेत; परंतु ॲलोपॅथीमध्ये प्रात्यक्षिकांना मोठे महत्त्व आहे. आमचा आयुर्वेदाला विरोध नाही; परंतु सरावाअभावी शस्त्रक्रियेची कौशल्ये विकसित करण्यासाठी आयुर्वेदामध्ये मर्यादा येतात; म्हणूनच आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देऊ नये, अशी आमची मागणी आहे.
- डॉ. गीता पिल्लाई, मानद सचिव, आएएमए, कोल्हापूर
कोट
डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन, चार वर्षे प्रशिक्षण घेतात. नंतर वरिष्ठांच्या हाताखाली सराव करतात. मग ते शस्त्रक्रिया करायला सुरुवात करतात. अशा पद्धतीने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याचा शॉर्टकट हा दोन शाखांमधील सीमा पुसण्यासाठी असला तरी तो धोकादायक आहे.
डॉ. शीतल देसाई, खजिनदार, आयएमए, कोल्हापूर