कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध मंदिरात सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक विधी करण्यात आले. तर काही ठिकाणी प्रसाद वाटपही झाले.
दरवर्षी हनुमान जयंतीला मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक विधी, अभिषेक, पूजा अर्चा, भजन-कीर्तन, महाप्रसाद अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्यावर्षीपासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरातील उभा मारुती चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, सोन्या मारुती, गंगावेश, शहाजी वसाहत, उजळाईवाडी येथील हनुमान मंदिरात साधेपणाने धार्मिक विधी करण्यात आले. मंदिराला फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली. तर काही तरुण मंडळे व भागातील नागरिकांनी शिरा प्रसादाचे वाटप केले. रेल्वे स्थानकातील हनुमान मंदिरांतही पूजाअर्चा करून जयंती साजरी करण्यात आली.
--
फोटो नं २७०४२०२१-कोल-हनुमान जयंती
ओळ : कोल्हापुरातील सोन्या मारुती मंदिरात मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्त मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
---