प्रगती जाधव-पाटील / सातारासातारा शहर... पेन्शनर्स सिटी, शांत शहर ही आपली वर्षानुवर्षांची ओळख आहे. दिवसा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असलेला सातारा रात्रीच्यावेळेत तितकाच भयावह आहे. रस्त्यावर एकट्या फिरणाऱ्या महिलेकडे निव्वळ ‘त्याच’ नजरेने पाहणाऱ्यांची संख्या इथेही असल्याचे खेदाने नमुद करावे लागते.शहरातील मुख्य बसस्थानक, क्रीडा संकूल, जिल्हा परिषद, गोडोली नाका आणि भू विकास बँक परिसरात ‘लोकमत’ ने शुक्रवारी रात्री स्टिंग आॅपरेशन केले. ज्या सातारकरांच्या विश्वासार्हतेच्या शपथा घेतल्या जात होत्या त्या शहरातील सामाजिक स्वास्थ्य किती बिघडले आहे हे या स्टिंग आॅपरेशन मधून स्पष्ट झाले आहे. रात्री दहानंतर महिला किती असुरक्षित आहेत तेही यानिमित्ताने उघडकीस आलइे.रात्रीच्यावेळी एकट्या निघालेल्या महिलेकडे बघताना प्रत्येकाच्या नजरा वाकड्या होत होत्या कोणी धाडस करून दुसऱ्यांदा तिला ओलांडून जात होते तर काहींनी एका नजरेतच आपले इरादे स्पष्ट केले. अशातच चाळीशीतील इसमाने तिचा पाठलाग सुरू केला. हे लक्षात आल्यानंतर तिने ‘टिम’ला अलर्ट केले. त्यानंतर सुमारे अर्धा तास तो पाठलाग करून तिच्या पाठीमागे उभा राहिला. आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने मोबाईलच्या टॉर्चचाही वापर केला. सव्वा दहाच्या सुमारास स्टॅण्ड परिसरात उभे असतानाच आणखी एक दुचाकीस्वाराने प्रतिनिधी समोरून दोन तिनदा गाडीवर घिरट्या घातल्या. त्यानंतर रस्त्याच्या विरूध्द बाजूला जावून थांबून त्याने तिथून हातवारे केले. त्यानंतर प्रतिनिधी क्रीडा संकुलाच्या मार्गाने पुढे गेली. तर त्याने तिथेही पाठलाग सुरू केला. पाठलाग करणाऱ्याची पुढे इतकी मजल वाढली की तो रस्त्याच्या विरूध्द बाजूने तिला ‘ऐ येतीस ना’ असे जोर जोरात विचारू लागला. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकूलाच्या बाहेर उभी असतानाही अनेकांनी वाहनाचा वेग कमी करून आपला कटाक्ष टाकत येण्याची गळ घातली.भारतीय संस्कृती ही मातृसत्ताक मानली जाते. आपल्याकडे स्त्रियांना देवी म्हणून पुजले जाते. प्रत्येकाच्या घरात आजी, आई, बहिण, बायको, मुली या नात्यांच्या नावाने स्त्री देहाचा वावर असतो. पण जेव्हा हा देह अनोळखी चेहऱ्याने रस्त्यावर एकटा फिरतो त्यावेळी कोणालाही त्यात आपली नाती दिसत नाहीत. त्यावेळी पुरूष असतो नर आणि स्त्री असते मादी! स्त्री देहाची लाज वाटावी इतक्या वाईट पध्दतीने पुरूषांच्या नजरा तीच्या अंगा खांद्यावर खेळल्या. आली तर नेली नाहीतर डोळ्यानेच लुटली ही मानसिकता रस्त्यावर दिसली.तिरक्या कटाक्षांना उधाणपुसेगाव : खटाव तालुक्यातील नेहमीच वर्दळीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री नऊ ते साडेअकरा या वेळेत ‘लोकमत’ची महिला पत्रकार रस्त्यावर थांबले. अडीच तासांच्या या काळात अनेक थरार अनुभवण्यास मिळाला.स्थळ : छत्रपती शिवाजी चौकात रात्री अकरापर्यंत प्रवाशांची ये-जा सुरूच होती. रात्री १० व १०.४५ ची सोलापूर-सातारा एसटी बस गेल्यानंतर चौक शांत-शांत झाला. सगळ्या गाड्या गेल्यानंतर एकएक करून सगळी दुकाने, पानपट्या बंद होऊ लागल्या. रात्रगस्तीचा पोलीसही जागेवर नव्हता. तुरळक स्वरूपात दोनचार तरूण तरुणांची ये-जा होत होती. काळाकुट्ट अंधार अन कडाक्याच्या थंडी अशाच वेळी एक महिला अत्यंत धाडसाने गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभी होती. त्यांची सोलापूरकडे जाणारी गाडी चुकली होती ते कर्नाटक भागातील काही प्रवाशांनी त्या महिलेकडे प्राप्त परिस्थितीत वाहनाबाबत चौकशी केली. काही तरूण मंडळी उभ्या महिलेकडे तिरकाच कटाक्ष टाकत पुढे निघून गेली. पण त्यानी उभ्या असलेल्या महिलेशी बोलण्याचे धाडस केले नाही. दारूबंदी असतानाही मद्यपान करुन तळीराम जवळून जात होते. पण त्यांचा या महिलेकडे लक्षही नव्हते.थंडी कडाक्याची असल्याने माणसांअभावी चौकही शांत झाला होता. एवढ्या रात्री एकही गाडी त्या भागात जाणारी नव्हती. केवळ येथील रिक्षा स्टॉपवर एक रिक्षा उभी होती. बराच वेळ झाला होता. तेवढ्यात याच गावातील एक सभ्य गृहस्थ दुचाकीवर चौकात आले. परिस्थितीतचे भान ओळखून त्या रिक्षावाल्याला शंभर रूपये त्याच्या खिशातून देऊन त्या महिलेला घरी सोडण्यास सांगितले. महिला सुखरूप घरी पोहचल्यानंतर दिलेल्या नंबरवर त्या महिलेच्या घरच्यांना फोन करावयास सांगून खात्रीही केली. हायवेवर लिफ्ट मागताच गाड्या कचाऽऽकच थांबल्याशिरवळ : वेळ रात्रीचे १० वाजून ३९ मिनिटे... स्थळ - शिरवळ येथील पंढरपूर फाट्यावरील सातारा बाजूकडे जाणाऱ्या महामार्गावर जुन्या वाहतूक पोलीस चौकीसमोर तोंडाला स्कार्फ बांधून एक तरुणी वाहनाची वाट पाहत बसलेली... ही तरुणी महिला पत्रकार . ‘लोकमत’च्या टिमने महिलांच्या सुरक्षिततेबाबत असलेल्या वस्तुनिष्ठ पंचनाम्यासाठी लावलेला लोकमतचा सापळा म्हणजेच स्ट्रींग आॅपरेशन.वेळ रात्रीचे ११ वाजून १० मिनिटे... स्थळ - पंढरपूर फाटाच. एक तरूण तरुणीला पाहून आजूबाजूचा कानोसा घेत थोड्याच अंतरावर येऊन गाडीला हात करण्याचे नाटक करतो. तसेच संबंधित तरुणीकडे कटाक्ष टाकत त्या तरुणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. अचानक पाठीमागे वळत त्याठिकाणी दुसरी व्यक्ती येत असल्याचे पाहून तेथून तो तरूण लोणंद रस्त्याकडेला असणाऱ्या एका हॉटेलजवळ येऊन पसार होतो. महामार्गावरून येथील स्थानिक त्रिकूट मोटारसायकलवरून वेगात येत तरुणीला पाहत जोरदार आरडाओरडा करीत वेगात निघून जातात तर एक तरूण मोटारसायकलवरून येत तरुणीपासून काही अंतरावर येऊन मोटारसायकल थांबवत कोणाची तरी वाट पाहत असल्याचे भासवतो. काही वेळ थांबल्यानंतर संबंधित तरूण मोटारसायकल सुरू करून निघून जातो. पण या वेळात तो तरूण गाडीच्या आरशातून संबंधित तरुणीकडे पाहण्याचा एकही क्षण सोडत नाही.वेळ रात्रीचे १२ वाजून ०२ मिनिटे. स्थळ : शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर शिरवळमध्ये प्रवेश करणारा रस्ता... एक खासगी लक्झरी बस येऊन तरुणीपासून काही आंतरावर थांबते. पण संबंधित तरुणी याकडे कानाडोळा करत असल्याचे पाहून संबंधित लक्झरीमधील चालक बसमधील क्लिनरला खाली उतरण्यास सांगून तरुणीकडे जाण्यास सांगतो. क्लिनरही त्या तरुणीकडे येत असताना सर्व्हिस रस्त्यावरून एक व्यक्ती येत असल्याचे पाहून क्लिनर तेथून पळ काढत बस तेथून घेऊन जाण्यास सांगतो.
‘अंधारात एकटी’भोवती पुरुषांच्या घिरट्या!
By admin | Updated: January 18, 2015 00:21 IST