लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरकारने सरसकट दुकाने उघडण्यावरील निर्बंध कायम राखल्याने सोमवारी शहरातील दुकानदारांनी अर्धे शटर उघडे ठेवत दारात बसून व्यापार चालू ठेवला. राजारामपुरीतील अपवाद वगळता प्रशासनानेही व्यापक आणि कडक कारवाई न करता दुकानदारांना सहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते. यामुळे दुकानदारांना अर्धे शटर उघडून व्यापार करण्याची मुभा मिळाली.
दरम्यान, राजारामपुरी येथील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी विरोध केला. या वेळी व्यापारी आणि प्रशासन आमने-सामने आले. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून नाराजी व्यक्त केली. कोरोना आजाराच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्याने अजूनही सरकारने सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ अत्यावश्यक वस्तू, सेवेचीच दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे; पण गेल्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच दिवस सरसकट दुकाने उघडल्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या आत आहे. यामुळे सरकारने सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वच व्यापारी संघटनांची होती. पण सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील महाद्वार रोड, बिंदू चौक परिसर, सुभाष रोड, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरीतील आदी बाजारपेठेतील सरसकट दुकाने अर्धे शटर उघडून व्यवहार पूर्ववत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुकानासमोर कामगार थांबवून व्यापार केला. ग्राहकांचीही संख्याही मोठी राहिली. आलेल्या ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू देण्याचा प्रयत्न दुकानदार करीत होते. महापालिकेचे पथक महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी अशा ठिकाणी फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. या पथकाचे वाहन आल्यानंतर शटर बंद केले जात होते. ते गेल्यानंतर अर्धे शटर उघडून व्यवहार केले जात होते. शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत असे चित्र राहिले. तीन महिन्यांपासून दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुकानातील कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आल्याने ते विविध मार्गाने व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समोरच्या बाजूचे अर्धे शटर उघडून तर मागील बाजूस दरवाजा असल्यास तेथून व्यापार केला जात होता.
दरम्यान, सकाळी दहा वाजता राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. यास पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला. दुकानदार आणि पोलीस, कर्मचारी आमने-सामने आले. दुकानदारांनी प्रशासनाच्या विरोधात राजारामपुरीतील मेन रोडवरील बिझनेस हाऊस येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
निदर्शनात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, प्रशांत पोकळे, दीपक पुरोहित, श्याम बासरणी, अनिल पिंजारी, विजय येवले, मनोज शहा, राजू जोशी, भरत रावळ, प्रफुल राठोड आदी व्यापारी सहभागी झाले होते.
चौकट
रस्ते वाहनांनी फुलले
शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते दुचाकी, चारचाकी वाहनांनी फुलून गेले होते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत राहिली. काही ठिकाणी रुग्णवाहिकांनाही खुला रस्ता न मिळाल्याने वाहतुकीच्या कोंडीत काहीवेळ अडकून राहावे लागले. बिंदू चौक, महाव्दार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होत राहिली.
पार्किंग फुल्ल
सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने अनेक जण चारचाकी वाहनांनी कार्यालयांना जाणे पसंत केले. यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी रस्त्यावर चारचाकी वाहनांची संख्या अधिक राहिली. परिणामी शहरातील सर्व पार्किंगची स्थळे फुल्ल राहिली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांची वर्दळ जास्त राहिली.