लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हज यात्रेसाठी केंद्राकडून दिले जाणारे अनुदान वर्षाला कमी होत असल्याने सामान्य नागरिक या यात्रेपासून वंचित राहत आहेत. यासाठी केंद्र सरकारने एकरकमी २५ हजार कोटी केंद्रीय हज कमिटीस द्यावेत; त्यातून स्वत:ची दहा विमाने खरेदी करून त्यांचा वापर हज यात्रेकरूंसाठी करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
हज यात्रेकरूंच्या प्रशिक्षणासाठी शेख कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. देशभरातून दरवर्षी लाखो भाविक हज यात्रेसाठी जातात; पण सामान्य माणसाला हा खर्च परवडत नसल्याने केंद्र सरकारच्या अनुदानातून यात्रेकरूंना सवलत दिली जाते. कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सातशे कोटी प्रत्येक वर्षाला दिले जात होते; पण केंद्रात भाजप चे सरकार सत्तेवर आल्यापासून अनुदानाच्या रकमेत कपात केली असून २०१५ मध्ये चारशे कोटी तर आता केवळ २०० कोटी रुपये सेंट्रल हज कमिटीला दिले आहेत. त्यातून यात्रेकरूंना सवलत देता येत नाहीत. परिणामी सामान्य भाविक यात्रेला जाऊ शकत नाहीत. ही बाब आम्ही केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
प्रत्येक वर्षी अनुदान देण्यापेक्षा एकरकमी २५ हजार कोटी द्यावेत. त्यातून दहा विमाने खरेदी करून दहा महिने ती भाड्याने देता येतील आणि दोन महिने हज यात्रेसाठी वापरता येतील. त्यामुळे सामान्य भाविकांचा प्रवास सोयीस्कर होईल. असे शेख यांनी सांगितले. हज यात्रेसाठी देशातून २ लाख ४० हजार, तर महाराष्ट्रातून १० हजार ५०० भाविक २० आॅगस्ट रोजी रवाना होणार आहेत. कोल्हापुरातील १२७४ लोकांनी यात्रेला जाण्यास इच्छुूक होते; पण हज कमिटीने २९१ जणांना संधी दिली. जिल्ह्यातील हजबाबतची संपूर्ण जबाबदारी इकबाल देसाई यांनाच हज कमिटीने दिली असून काही वाद असल्यास आपआपसात मिटवावा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सेंट्रल हज कमिटीचे उपाध्यक्ष जीना शेख, जहॉँगीर अत्तार, इकबाल देसाई, जहॉँगीर ढालाईत, सलीब बागवान, के. ए. बागवान, अल्ताफ शेख, हमजेखान सिंदी, नजीर देसाई, तौफीक बागवान, इकबाल हकीम आदी उपस्थित होते.
अमरनाथ घटनेचा निषेध!
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. असा हल्ला करणारा माणूस नसेल केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आंतकवाद्यांचा बिमोड करावा, असेही इब्राहीम शेख यांनी सांगितले.
कोल्हापुरात ‘हज हाऊस’साठी प्रयत्नशील नागपूर व औरंगाबादच्या धर्तीवर कोल्हापुरात ‘हज हाऊस’ व्हावे, अशी मागणी आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सेंट्रल हज कमिटीकडून तीन कोटी मदत दिली जाईल व राज्य सरकारच्या मदतीने बांधले जाईल, असे शेख यांनी सांगितले.