कुरुंदवाड : राज्यात बंदी असतानादेखील कुरुंदवाडमध्ये गुटखा, मावाची राजरोसपणे विक्री केली जात आहे. येथील शहर मावा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील मावा दररोज २२ गावांत पोहोच केला जातो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पोलिसांना या प्रकाराची माहिती असूनही मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई न करता किरकोळ विक्रेत्यांवर दररोज दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई शहरातील मावा, गुटखा बंद करण्यासाठी की केवळ वरिष्ठांना कारवाई दाखविण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
राज्य सरकारने राज्यातील गुटखा, मावा उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवरही बंदी घातली आहे. मात्र, कर्नाटकातून शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करत असताना अनेकदा सापडले आहे. शिवाय शहरात गुटख्याचे साठेही सापडले आहेत. इतकेच नव्हे तर मावा उत्पादनासाठी शहर प्रसिद्ध आहे. दररोज शहरातून सुमारे बावीस गावांना मावा पुरवठा केला जातो. मावा नेण्यासाठी सकाळी सातपासूनच लोकांची गर्दी असते. मात्र, याकडे येथील पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पकडून कारवाईचा डांगोरा पिटत आहेत.
शहरातील मावा, गुटखा बंद करावयाचेच असेल तर माव्याचे उत्पादन करणाऱ्या, गुटखा साठवणूक करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे.