कोल्हापूर : जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर गाजविलेल्या खेळाडूंचा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी विशेष कार्यक्रमात गौरव केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील ताराराणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते राष्ट्रकुल पदक विजेती राही सरनोबत, गणेश माळी, ओंकार ओतारी, चंद्रकांत माळी तसेच प्रशिक्षक प्रदीप पाटील व अजित पाटील यांचा सत्कार झाला. राष्ट्रीय युवक पुरस्कार अवधूत गायकवाड, राष्ट्रीय युवती पुरस्कार मेघाराणी पाटील आणि जनकल्याण सामाजिक संस्थेस राष्ट्रीय स्तरावरील संस्था पुरस्कार, असे पुरस्कार वितरण करण्यात आले. नॅशनल टॅलेंट सर्च शिष्यवृत्तीप्राप्त आशिष पाटील, अंबरीश पत्की, सुनील पेंडुरकर या विद्यार्थ्यांचा गौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महिला बाल कल्याण विभागातर्फे देण्यात येणारा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार-२०१२ श्रीमती अनुराधा भोसले यांना, तर २०१३ चा पुरस्कार आशाताई टोपकर यांना वितरित करण्यात आला. कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, मनपा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणी खेळाडूंना पालकमंत्र्यांनी गौरविले
By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST