सातारा : प्रतापगडावर पोलीस बंदोबस्त असतानाही भारतीय रक्षक आघाडीतर्फे गनिमी कावा करत शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वधदिन म्हणजेच शिवरायांचा शौर्यदिन साजरा करण्यात आला. भारतीय रक्षक आघाडीचे प्रवर्तक टेकसास गायकवाड, प्रदेशाध्यक्ष व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सचिव माजी नगरसेवक अमर गायकवाड यांना वाडा येथे पोलिसांनी प्रतापगडावर जाण्यास मज्जाव केला होता. तसेच पुणे, सातारा, वाई, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचगणीसह महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांना अटकाव केला होता. ‘आम्ही कार्यकर्ते नसून पर्यटक आहोत,’ असे सांगत पोलिसांना चकवा देत कार्यकर्ते प्रतापगडावर पोहोचले. गडावर पोहोचल्यावर शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. गायकवाड म्हणाले, ‘दि. १० नोव्हेंबर १६५९ हा दिवस शिवशाही दिन क्रांतिकारी दिवस आहे. कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझल खानाचा वकील होता. वकील हा मध्यस्थी करण्यासाठी, बोलण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी असतो. शस्त्र उगारण्यासाठी व हल्ला करण्यासाठी नाही. कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवरायांवर वार करण्याचे धाडस केले. मात्र, शिवरायांनी त्याची खांडोळी केली, असा शिवरायाचा शौर्यदिन साजरा करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.अशोक गायकवाड म्हणाले, ‘कृष्णा भास्कर कुलकर्णी वधदिनाला विरोध करणाऱ्यांनी इतिहास नीट वाचावा. त्यांनी आरोप करण्यापूर्वी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मा. म. देशमुख, आ. ह. साळुंखे, श्रीमंत कोकाटे, गोविंद पानसरे, पार्थ पोळके यांची पुस्तके वाचावीत.’अमर गायकवाड म्हणाले, ‘बहुजन समाजाने मन, मनगट, मेंदू सशक्त करण्यासाठी भारतीय रक्षक आघाडीत सहभागी व्हावे. बहुजन समाजातील महामानवांचा चुकीचा व आकसाने लिहिलेला इतिहास पुराव्यानिशी शोधून काढून जागृती करण्याचे कार्य करत आहे.’यावेळी शाहीर प्रकाश फरांदे, किशोर गालफाडे, सुरेश बोतालजी, संतोष गायकवाड, दिलीप कांबळे, सुधाकर बगाडे, बबन सोनावणे, मधुकर भिसे, योगेश शिंदे, बबन साठे, किरण भुजबळ, नितीन कांबळे, विवेक घाडगे, उमेश खंडजोडे, संतोष कमाने, शरद गायकवाड, गणेश बोतालजी, जयवंत फरांदे, विष्णुपंत खवळे, शशिकांत गाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गनिमी काव्याने शिवरायांचा शौर्यदिन साजरा
By admin | Updated: November 13, 2014 23:42 IST