जयसिंगपूर : वडार समाज कामगार सहकारी सोसायटीची अध्यक्ष निवड गणपूर्ती अभावी सभा तहकूब करण्यात आली. सुमारे दोन तास चाललेल्या गोधळामुळे कार्यालयात तणावपूर्ण वातावरण होते. सायंकाळी उशिरा सहा संचालकांनी आपले राजीनामे सहायक निबंधक कार्यालयात सादर केले. निवडणूक निर्णय अधिकारी एस. ए. भोई यांच्या अध्यक्षतेखाली वडार समाज कामगार सोसायटीची संचालक निवडीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या संस्थेचे एकूण २०६ सभासद असून, एकूण १३ जागांसाठी निवडणूक झाली. मात्र, यामध्ये ओबीसी १ व एसटीएसी १ या दोन जागांच्या निवडीसाठी संस्थेकडे सभासद नसल्याने ही पदे रिक्त होती. यावेळी अकरा संचालकांच्या निवडी बिनविरोध झाल्या होत्या. अध्यक्ष निवडीसाठी १३ संचालकांपैकी इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित दोन जागा रिक्त असल्यामुळे अध्यक्ष निवडीसाठी अकरा संचालकांना नोटीस बजावण्यात आली होती. आज, गुरुवारी येथील सहायक निबंधक कार्यालयात निवडीसाठी सभा झाली. यावेळी अकरा संचालकांपैकी साताप्पा रामू पवार, बाळू आण्णाप्पा पोवार, गंगाराम इराप्पा माने, लक्ष्मीबाई गणपती वडर, मारुती गणपती चौगुले, मनोहर शिवाजी नलवडे हे सहा संचालक उपस्थित होते. यावेळी भोई यांनी १३ संचालक असल्यामुळे गणपूर्तीसाठी सात संचालकांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सभा तहकूब करीत असल्याचे सांगितले. यामुळे गोंधळात भर पडली. अधिकाऱ्यांच्याबरोबर संचालक व समर्थकांनी शाब्दिक बाचाबाचा झाली. यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सभा तहकूब करायची होती, तर नोटीस का काढली, सात सदस्य उपस्थित लागतात हे यापूर्वी का सांगितले नाही, सभा तहकूब केल्याबाबत लेखी पत्र देण्याची मागणी केली. मात्र, याबाबत भोई यांनी लेखी देण्याचे टाळून अध्यक्ष निवडीची सभा पुन्हा बोलावून निवड करू, असे तोंडी आश्वासन दिले. त्यामुळे आणखीनच गोंधळ झाला. अखेर सहायक निबंधक धायगुडे यांनी जयसिंगपूर पोलिसांना पाचारण केल्यामुळे वातावरण शांत झाले. शेवटी सायंकाळी सहा संचालकांनी आपले राजीनामे दिले. (प्रतिनिधी)
अध्यक्ष निवडीवरून गोधळ
By admin | Updated: November 28, 2014 23:57 IST