लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्यासह शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूच्या प्रमाणतही वाढ होत आहे. वाढती मृत्युसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाची कोणती उपाययोजना कार्यान्वित आहे, त्या पार्श्वभूमीवर येथील आयजीएम रुग्णालयास पालकमंत्री सतेज पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे आयजीएम प्रशासनासह अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या लसीकरणासाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी होत आहे. मागणीच्या प्रमाणत पुरवठा कमी पडत आहे. केंद्राकडून लसीकरणाचा पुरवठाच कमी होत असल्यामुळे लसीकरणामध्ये खंड पडत आहे. केंद्र सरकार लसींचा ज्या प्रमाणात पुरवठा करत आहे, त्यानुसार नियोजन केले जात आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये लसीकरणामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. केंद्र सरकारने १ मेपासून १८ वर्षावरील व्यक्तींना लस देण्याची घोषणा केली आहे. यावेळी प्रशासन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होणार आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले.
कोरोना रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे यंत्रणा तोकडी पडत आहे. सद्याची परिस्थिती पाहता संसर्ग वाढण्याची शक्यता असून, प्रशासनास त्यासंदर्भात पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. दरम्यान, कबनूर (ता.हातकणंगले) येथील व्यंकटेश्वरा हायस्कूल कोविड केअर सेंटरला भेट दिली.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, जि.प. सदस्य राहुल आवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य सभापती संजय केंगार, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, नगरसेवक राहुल खंजिरे, शशांक बावचकर, मदन कारंडे, सुनील पाटील, संजय कांबळे, वैद्यकीय अधिकारी रवींद्रकुमार शेट्ये, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, महेश महाडिक, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२१०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयास पालकमंत्री सतेज पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, नगरसेवक राहुल खंजिरे, संजय कांबळे, आदी उपस्थित होते.
छाया-उत्तम पाटील