राजाराम पाटील -इचलकरंजी -नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या बंडामुळे नगरपालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट झाले असल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्षा कॉँग्रेसच्या, त्या राजीनामा देत नसल्याने त्यांच्या बंडास विरोधी शहर विकास आघाडीचा पाठिंबा आणि या सर्वाला राष्ट्रवादीतील कारंडे गटाचे सहकार्य, अशी पालिकेत स्थिती निर्माण झाली आहे.साधारणत: तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजप-शिवसेना-बंडखोर कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची शहर विकास आघाडी यामध्ये नगरपालिकेची निवडणूक लढविली गेली. या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत झाली. मतमोजणीनंतर कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७, असे एकूण ५७ नगरसेवकांचे पक्षनिहाय बलाबल नगरपालिकेमध्ये आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर कॉँग्रेसने राष्ट्रवादीलाही सत्तेत समाविष्ट करून घेतले. त्यामुळे नगरपालिकेत कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी सत्तेत आहे, तर शहर विकास आघाडी विरोधी पक्षाच्या बाकावर आहे.जून महिन्यामध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होताना इचलकरंजीचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित असल्याने या पदासाठी सहा नगरसेविकांनी इच्छा प्रदर्शित केली. म्हणून कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रत्येक नगरसेविकेला पाच महिने असे सहाजणींना नगराध्यक्षपद भूषविण्याचा मान देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे जून २०१४ मध्ये शुभांगी बिरंजे या नगराध्यक्षा झाल्या. त्यांचा पाच महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला तरीही त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाकडून त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला.पण नगराध्यक्षा बिरंजे यांनी आपल्याला पूर्ण कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून शहराचा विकास साधावयाचा आहे, असे सांगत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंडाचे निशाण रोवले. या बंडाला शहर विकास आघाडीने पाठिंबा व्यक्त केला आहे, तर कारंडे गटाच्या सहा नगरसेवकांचे नगराध्यक्षांना सहकार्य असल्याचे सांगण्यात आले. या सर्व घडामोडी होताना नगराध्यक्षांनी, मी कॉँग्रेसचीच असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे नगरपालिकेच्या राजकारणात यापूर्वी कधीही नव्हती अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. नगराध्यक्षा कॉँग्रेसच्या, त्यांना विरोधी बाकावर असलेल्या शहर विकास आघाडीचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीतील कारंडे गटाचे सहकार्य अशा स्थितीमुळे नगरपालिकेत विरोधी पक्षात कोण? असा सध्यातरी अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा पक्षप्रतोद बदलण्याच्या हालचालीनगरपालिकेत सध्याच्या या विचित्र परिस्थितीबाबत मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील जांभळे गट काहीसा अस्वस्थ आहे. कारण या स्थितीमुळे या गटाचे अस्तित्व नगण्य झाले आहे. परिणामी, जांभळे गटाकडे पाच नगरसेवक, तर कारंडे गटाकडे सहा नगरसेवक अशी स्थिती असल्याने पालिकेतील राष्ट्रवादीचा पक्षप्रतोद बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.‘सबका साथ, सबका विकास’सद्य:स्थितीस नगराध्यक्षांच्या बंडामुळे कोणी विरोधकच राहिला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीबाबत शहर विकास आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांना छेडले असता त्यांनी झटकन ‘सबका साथ, सबका विकास’ असे उत्तर दिले आणि त्यांच्या या उत्तराला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनीही दुजोरा दिला.
गट,गणासाठी १२३८ अर्ज
By admin | Updated: January 13, 2015 22:47 IST