सांगली : उत्कृष्ट जाहिरात ही आजच्या समाजाची गरज बनली आहे. किंबहुना या ६५ व्या कलेने अवघे विश्वच व्यापले आहे, असे प्रतिपादन आसमा सांगली या जाहिरात एजन्सीच्या असोसिएशनच्यावतीने साजऱ्या करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केले.१४ आॅक्टोबर १९०५ रोजी दत्ता बावडेकर यांनी भारतातील पहिली जाहिरात संस्था मुंबई येथे सुरू केली. तो दिवस महाराष्ट्रातील सर्व जिल्हा जाहिरात संघटनांच्यावतीने जाहिरात दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन जाहिरात संघटनांच्या फेम या राज्यस्तरीय फेडरेशनच्यावतीने करण्यात आले होते, अशी माहिती यावेळी आपल्या प्रास्ताविकामध्ये महेश कराडकर यांनी दिली. यावेळी प्रा. राजाभाऊ ताम्हनकर, अशोक इंगळे, मधुकर वाळिंबे व सुधाकर पंडितराव सांगली, जिल्ह्याच्या जाहिरात क्षेत्रातील ज्येष्ठांचा वैजनाथ महाजन यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सांगली शहरातील सर्व जाहिरात एजन्सीजचे संचालक, सर्व वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागाचे प्रमुख, जाहिरात व्यवस्थापक व सर्व जाहिरात प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच आकाशवाणी, एफएम रेडिओज व इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आसमाचे उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर राजेश शहा यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सांगलीत मंगळवारी ज्येष्ठ जाहिरातकर्मी प्रा. राजाभाऊ ताम्हनकर, मधुकर वाळिंबे, सुधाकर पंडितराव व अशोक इंगळे यांचा सत्कार वैजनाथ महाजन व आसमाचे उपाध्यक्ष उमेश देसाई यांनी केला.
उत्कृष्ट जाहिरात आजच्या समाजाची गरज
By admin | Updated: October 14, 2014 23:25 IST